‘आरएसएस’च्या कार्यक्रमाला जाणार नाही

कमलताई गवई यांचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्टीकरण

* प्रकृती बरी नसल्याचे कारण

अमरावती /1 ऑक्टोबर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या येत्या 5 ऑक्टोबरला अमरावतीत होणार्‍या विजयादशमी सोहळ्याला सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई यांना निमंत्रित करण्यात आल्यानंतर उद्भवलेल्या वादावर खुद्द कमलताईंनी प्रथमच भाष्य केले आहे. त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले की, माझे वय 84 वर्षांचे असून माझी प्रकृती बरी नसल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने सध्या उपचार घेत असून 5 ऑक्टोबरच्या कार्यक्रमाला मी जाणार नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 5 ऑक्टोबरच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने समाजमाध्यमावर व वर्तमानपत्रांमध्ये एक पत्र प्रकाशित झाले आहे, जे कदाचित आमच्या कुटुंबाशी स्नेह असलेल्या कुणीतरी समाजबंधूंनी लिहिले असेल; त्याबद्दल मला जास्त बोलायचे नाही. 5 ऑक्टोबरला होणार्‍या कार्यक्रमाची माहिती घेण्यासाठी माझ्या ओळखीतले काही लोक आले होते. आमच्या सर्वांप्रती मंगलभावना व मंगलकामना असतात, त्यामुळे आम्ही सर्वांचे स्वागत करतो, आमचा मैत्रीभाव व बंधुभाव सर्वांप्रती आहे.

कमलताईंनी स्पष्ट केले की, कार्यक्रमाला मी जाणार नाही; परंतु या कार्यक्रमांचे वृत्त प्रसारित झाल्याबरोबर अनेकांनी माझ्यावरच नव्हे तर स्मृतिशेष दादासाहेब गवई यांच्यावरही टोकाचे दोषारोपण केले. आम्ही आंबेडकरी विचाराला वाहून घेतलेले आहोत. दादासाहेब गवई यांचे जीवन आंबेडकरी चळवळीला समर्पित होते. दुसऱ्या विचारधारेच्या मंचावर आपले विचार मांडणेही गरजेचे असते आणि त्यासाठी धाडस लागते. दादासाहेब जाणूनबुजून अशा विरोधी मंचावर जाऊन वंचितांचे प्रश्न मांडत होते; हा त्यांच्या धोरणाचा भाग होता. त्यांनी संघाच्या कार्यक्रमात गेले, परंतु हिंदुत्व कधीही स्वीकारले नाही; त्यांनी समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यावर भाषण केले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधानिक विचार मांडले. कमलताईंनी सांगितले की, मी त्या विचार मंचावर गेले असते तरीही आंबेडकरी विचार आणि विपश्यनाच मांडली असती. स्मृतिशेष दादासाहेब त्या विचारधारेच्या मंचावर गेले आणि तिथे त्यांनी आंबेडकरी विचार मांडले. आपण कुठेही गेलो तरी आंबेडकरी विचारच मांडणार, ते शेवटच्या धडापर्यंत सोडणार नाही; हा आमचा संस्काराचा भाग आहे. तरीही माझ्यावर आणि दादासाहेब गवई यांच्यावर वस्तुस्थितीशी सुसंगत नसलेली टीका होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आणि आपल्या जीवनाचा मार्ग आंबेडकरी चळवळीला व विपश्यनेला वाहून दिला आहे.

 

संबंधित बातम्या

Back to top button