भाजपा प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या ताफ्यावर सोयाबीन फेकले
अमरावतीत भाजप-काँग्रेस आमनेसामने

* शेतकर्यांच्या प्रश्नांवरून काँग्रेसचा मोर्चा
अमरावती /26 सटेंबर : शेतकर्यांच्या नुकसानीचा प्रश्न आणि त्यावर शासनाने मदत करावी या मागणीसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी काढलेल्या मोर्चामुळे आज अमरावतीत मोठा गोंधळ उसळला. या मोर्चादरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या ताफ्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी सोयाबीन फेकत निषेध व्यक्त केला. या घटनेमुळे पंचवटी चौकात बराच वेळ वातावरण तणावपूर्ण झाले. अतिवृष्टी आणि महापुरामुळे मराठवाडा, विदर्भ आणि राज्यातील विविध भागात शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकर्यांना तातडीची आर्थिक मदत आणि नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी अमरावती तालुका काँग्रेसतर्फे तालुका अध्यक्ष अमित गावंडे यांच्या नेतृत्वाखाली पंचवटी चौकातून मोर्चा काढण्यात आला होता. याचवेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी आयोजित पदाधिकारी मेळाव्यास हजेरी लावण्यासाठी अमरावतीत आले होते. पंचवटी चौकात त्यांच्या स्वागताचा कार्यक्रम होत असतानाच काँग्रेसचा मोर्चा तिथे दाखल झाला. भाजप कार्यकर्त्यांच्या स्वागत सोहळ्यानंतर चव्हाण यांचा ताफा पोटे कॉलेजच्या दिशेने रवाना होत असतानाच काँग्रेसच्या मोर्चातील कार्यकर्त्यांनी सोयाबीन फेकून निषेध नोंदवला. या घटनेमुळे भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच राडा झाला. पोलिसांनी लगेच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र काही काळ चौकात गोंधळाचे वातावरण राहिले. या दरम्यान पंचवटी चौकातील वाहतूक ठप्प झाली होती. वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. काँग्रेसकडून सांगण्यात आले की, राज्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झाले आहेत. हाताशी आलेलं पीक, जनावरं, घरदार आणि अन्नधान्य वाहून गेलं आहे. सरकारने तत्काळ नुकसान भरपाई जाहीर करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल. दुसरीकडे, भाजपाने या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. त्यांच्या मते काँग्रेसनं शेतकर्यांच्या प्रश्नाच्या नावाखाली राजकीय शोशा केला असून शांततेत चालणार्या कार्यक्रमात अराजक माजवण्याचा प्रयत्न केला. एकूणच, शेतकर्यांच्या प्रश्नावरून काँग्रेस आणि भाजप आमनेसामने येत असल्याचे चित्र अमरावतीत पाहायला मिळाले. शेतकर्यांना तातडीची मदत द्यावी या मागणीमुळे सुरू झालेला संघर्ष आता राजकीय रंग घेत असल्याचं स्पष्ट दिसत आहे.




