मालवीय चौकातील नाल्यात युवकाचा मृतदेह आढळला
मृतकाच्या हातावर ‘मनीष’ नावाचा टॅटू

* मृतकाचे वय अंदाजे 30 ते 35 वर्षांच्या दरम्यान
* कोतवाली पोलिसांकडून तपास सुरू
अमरावती /26 सप्टेंबर : स्थानिक सिटी कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत मालवीय चौकात मुरली टायर्सजवळील क्वालिटी ऑटो पार्ट्सच्या मागे असलेल्या नाल्यातून एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. क्वालिटी ऑटो पार्ट्समध्ये काम करणारा एक तरुण लघुशंकेसाठी दुकानाच्या मागे असलेल्या नाल्यात गेला तेव्हा ही घटना उघडकीस आली. त्याने तात्काळ दुकान मालक आणि कोतवाली पोलिसांना घटनेची माहिती दिली. कोतवाली पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले, त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला. पोलिस सूत्रांकडून असे दिसून आले आहे की, अज्ञात मृत तरुणाचे वय ३० ते ३५ वर्षांच्या दरम्यान असावे. त्याच्या शरीरावर फक्त अंतर्वस्त्र होते आणि एका हातात मनीष नावाचा टॅटू कोरलेले आढळले. कोतवाली पोलिसांनी उपलब्ध पुराव्यांवरून मृत तरुणाची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. घटनेची माहिती वार्यासारख पसरताच मालवीय चौकात नागरिकांची मोठी गर्दी झाली. या घटनेत घातपात की आत्महत्या, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.




