अप्पर वर्धा धरणाचे सर्व 13 दरवाजे पुन्हा उघडे
1050 घनमीटर पाण्याचा विसर्ग

-अवघ्या पाच दिवसांत तिसर्यांदा आली वेळ
-पर्यटकांची वाढती गर्दी; पोलीसांचा पहारा
मोर्शी / 17 सप्टेंबर : अप्पर वर्धा धरणातून पुन्हा मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. अवघ्या पाच दिवसांच्या आत तिसर्यांदा धरणाची सर्व 13 वक्रद्वारे उघडण्यात आली असून यामुळे वर्धा नदीच्या पाण्याची पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे. अप्पर वर्धा धरण परिसरात पावसाचा जोर कायम राहिल्याने धरण प्राधिकरणाने पुन्हा एकदा सर्व 13 वक्रद्वारे उघडण्याचा निर्णय घेतला. आज बुधवारी, 17 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता धरणाचे 13 पैकी 13 दरवाजे 50 सेंटीमीटर उघडण्यात आले असून त्यामधून तब्बल 1050 घनमीटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग वर्धा नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
याआधी 12 व 13 सप्टेंबर रोजीही धरणाची सर्व 13 वक्रद्वारे प्रत्येकी 40 सेंटीमीटर उघडण्यात आली होती. त्यावेळी प्रत्येकी 844 घनमीटर प्रतिसेकंद या प्रमाणात विसर्ग करण्यात आला होता. अवघ्या पाच दिवसांच्या आत तिसर्यांदा झालेला हा मोठा विसर्ग पाणलोट क्षेत्रातील जोरदार पावसामुळे अपरिहार्य झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. मध्यप्रदेशातील जाम नदी व सालबर्डी येथून वाहणारी माडू नदी तुडुंब भरून अप्पर वर्धा धरणाकडे येत असल्याने जलाशयाचा साठा झपाट्याने वाढला आहे. या पार्श्वभूमीवर धरणात शिरणारा येवा, अपेक्षित पर्जन्यमान तसेच प्रचलन सूचीत नमूद शास्त्रीय मापदंडांचा विचार करून 1050 घनमीटर पाण्याचा विसर्ग करणे भाग पडले.
2 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजता धरणातील जलसाठ्याची टक्केवारी 96.27 होती. धरणाची निर्धारित पाण्याची पातळी 342.50 मिलिमीटर एवढी आहे, तर आज ती पातळी 342.37 मिलिमीटरवर पोहोचली आहे. त्यामुळे धरण जवळपास 97.39 टक्के भरलेले आहे. यामुळे येणार्या पावसाची शक्यता लक्षात घेता जलसाठा संतुलित ठेवण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. दरवाजे संपूर्णपणे उघडल्याने परिसरात पुन्हा एकदा पर्यटकांची मोठी गर्दी उसळली आहे. धरणातून कोसळणार्या प्रचंड पाण्याचे विहंगम दृश्य टिपण्यासाठी आणि पाण्याचे तुषार अंगावर झेलण्यासाठी पर्यटकांनी परिसर गजबजून गेला आहे. मात्र, गर्दीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोर्शी पोलीस ठाणे आणि आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अप्पर वर्धा धरणावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. धरण परिसरातील जलप्रवाहित दृश्ये आकर्षण ठरत असली तरी वर्धा नदीखोर्यातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.




