मेळघाटात बाहेरील वाघ सोडलेले नाहीत

अफवांना बळी पडू नका, उपवनसंरक्षकांचा खुलासा

-15 ऑक्टोबरपासून जंगल सफारी सुरू
अमरावती / 16 सप्टेंबर : मेळघाट व्याघ्र प्रकल्पात बाहेरील वाघ सोडण्यात आले असल्याची चर्चा पूर्णपणे निराधार असल्याचे गुगामल वन्यजीव विभागाच्या उपवनसंरक्षक कीर्ती जगदाळे यांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी या संदर्भातील अफवांना बळी न पडता शांत राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
गुगामल वन्यजीव अभयारण्याचे क्षेत्रफळ तब्बल 64 हजार हेक्टर इतके विशाल असून ते वाघांसह असंख्य वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवासस्थान आहे. येथे जंगल संवर्धनासोबतच परिसंस्थेचा समतोल राखण्यासाठी विभागामार्फत विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. यात जंगलातील कुरण विकास, अनिकेत बंधारे उभारणी, जलसंधारण व मृदसंधारणाची कामे, धूपनियंत्रण उपाय, तसेच गवतवाढ प्रोत्साहन अशा महत्त्वाच्या उपक्रमांचा समावेश आहे.
वन विभागाकडून राबविण्यात येत असलेला ‘एक पेड मा के नाम’ हा उपक्रम विशेष लक्षवेधी ठरत आहे. या माध्यमातून नागरिकांना स्वतःच्या आईच्या नावाने वृक्षारोपण करून पर्यावरणाशी भावनिक नातं दृढ करण्यास प्रवृत्त केले जात आहे. या उपक्रमामुळे पर्यावरणाबद्दल जनतेची बांधिलकी आणखी बळकट होईल, असे उपवनसंरक्षक कीर्ती जगदाळे यांनी सांगितले. जंगल सफारीसाठी येणार्‍या पर्यटकांनी ठरावीक नियमांचे पालन करण्याचे आवाहनही उपवनसंरक्षक जगदाळे यांनी केले आहे.
जंगल परिसरात मोबाईल फोनचा अतिरेकी वापर टाळावा, मद्यधुंद अवस्थेत जंगलात प्रवेश करण्यास सक्त मनाई आहे, वन्यजीव व पर्यावरणाचे रक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे अशा सुचना जगदाळे यांनी केल्या आहे. पर्यटकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे 15 ऑक्टोबरपासून जंगल सफारी पुन्हा सुरू होत आहे. त्यामुळे मेळघाटातील समृद्ध जैवविविधता आणि वाघांचा नैसर्गिक अधिवास जवळून अनुभवण्याची संधी उपलब्ध होणार आहे. जरी विभागाकडे कर्मचार्‍यांची काहीशी कमतरता असली तरी चिखलदरा, हरीसाल, ढाकणा व चौराखेडा या चार प्रमुख वनपरिक्षेत्रांत अत्याधुनिक कॅमेरे बसवून वाघ व इतर वन्यजीवांच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवले जात आहे, अशी माहिती उपवनसंरक्षक कीर्ती जगदाळे यांनी दिली.

संबंधित बातम्या

Back to top button