ढगफुटी सदृश पावसाने टाकरखेडा संभू गाव जलमय
घरं, शेतं पाण्याखाली; आष्टी मार्गावरील वाहतूक ठप्प

टाकरखेडा संभू / 16 सप्टेंबर : भातकुली तालुक्यातील टाकरखेडा संभू या परिसरात मंगळवारी दुपारी झालेल्या अवकाळी पावसाने ग्रामस्थांना अक्षरशः धास्तावून सोडले. दुपारी साधारण एक ते दोन या वेळेत तब्बल तासभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे गावातील रस्ते, अंगणे, घरं आणि शेतजमिनी जलमय झाल्या. परिस्थिती इतकी भीषण होती की गावाच्या मुख्य भागात सरळ पाणी घरात घुसले, तर शेतकरी बांधवांचे पिके पाण्याखाली आल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
आष्टी ते टाकरखेडा संभू या मार्गावर पाण्याचे महापूरसदृश चित्र दिसत होते. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीची साधनं पूर्णपणे ठप्प झाली. जिल्हा परिषद शाळेसमोरील जळका मार्ग बुडाल्याने नागरिकांना कमरेभर पाण्यातून वाट काढावी लागली. हा मार्ग संपूर्ण बंद झाल्याने ग्रामस्थांनी दरम्यान मोठा त्रास सहन केला. गावातील शेतकरी वर्ग पाण्याने डबघाईला आलेल्या पिकांकडे हताशपणे पाहत होता. तर दुसरीकडे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व उर्दू शाळेत शिकणारे लहान मुलं पावसाच्या पाण्यात अडकून पडले. तासभर कोंडीत सापडलेल्या मुलांना शेवटी गावकर्यांनी प्रत्यक्ष खांद्यावर घेऊन सुरक्षित घरी पोहोचवले.
अचानक घडलेल्या या मुसळधार पावसाच्या घटनेनंतर गावामध्ये भीतीचे व अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाकडून तातडीने पंचनामा करून आपत्कालीन पावले उचलण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.




