समृद्धी महामार्गावर गोवंश तस्करीला उधाण

पोलिसांनी दिले 41 पशुधनाला जीवनदान

-टोल नाका तोडून आरोपींची पलायनयोजना फसली
-तिघांवर गुन्हे, 15 लाखाचा मुद्देमाल जप्त
धामणगाव रेल्वे/ 15 सप्टेंबर : धामणगाव रेल्वे परिसरात सोमवारी सकाळी घडलेल्या घटनेने संपूर्ण खळबळ उडाली आहे. समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावरून वेगाने निसटलेला लालसर रंगाचा आयशर ट्रक (क्रमांक एमएच 40 सीटी 4812) पोलिसांच्या नजरेस पडला. वाहनावर पिवळ्या ताडपत्रीचे आच्छादन असल्याने यात शंका निर्माण झाली. महामार्ग पोलिस केंद्राचे उपनिरीक्षक जमनादास सोनटक्के यांच्या पथकाने तत्काळ नाकाबंदी उभारली आणि देवगाव चौफुली येथे संशयित वाहन रोखण्यात यश मिळवले.
वाहनचालक बलकरण बाजु नागवंशी (31, रा. छिंदवाडा, मध्यप्रदेश) यासह त्याचे दोन साथीदार सुकरलाल जोगी खारे (28) व सोनु शिवनाथ मेहलवंशी (30) हे तिघेही पोलिसांच्या ताब्यात आले. वाहनाची तपासणी केली असता लाकडी पट्ट्यांनी बनवलेल्या कप्प्यांमध्ये गाय-बैलांना अमानुष पद्धतीने कोंबून कत्तलीसाठी वाहतूक होत असल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीस आले. या निर्दयी प्रवासात चार जनावरे मृत अवस्थेत सापडली, तर उर्वरित 41 पशुधनास मुक्त करून तळेगाव दशासर पोलिसांच्या देखरेखीखाली चिरोडी येथील श्री भगवान परशुराम गौशाला चॅरिटेबल ट्रस्टकडे सोपविण्यात आले.
या कारवाईदरम्यान गोरक्षा मंच, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद यांसारख्या स्थानिक संघटनांच्या कार्यकर्त्यांचीही साथ पोलिसांना मिळाली. तपासात आणखी एक धक्कादायक बाब उघड झाली-सदर ट्रकचा नोंदणी क्रमांक खोटा असल्याचेही निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी तीनही आरोपींवर प्राण्यांवरील क्रूरतेस प्रतिबंध अधिनियमान्वये तसेच संबंधित कायद्यांअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संपूर्ण कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या आदेशानुसार करण्यात आली. अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. यामध्ये गुन्हे शाखेचे निरीक्षक किरण वानखडे, महामार्ग दत्तापुरचे सहाय्यक निरीक्षक गजानन गजभारे, सपोनि विशाल पोळकर, तसेच स्थानिक पोलिस अधिकारी अमर काळे, सागर गौडी, पवन अलोने, रमेश दाते, मनीष कांबळे आदींचा सहभाग होता.

संबंधित बातम्या

Back to top button