शहरात पहिल्यांदाच चरसची मोठी खेप उधळली

एक आरोपी जेरबंद, दुसरा फरार

 -5 लाख रुपयांचे 1 किलो चरस जप्त
-नागपुरी गेट डीबी पथकाची कारवाई
अमरावती / 15 सप्टेंबर :  शहरात प्रथमच चरसची तब्बल एक किलोची खेप पोलिसांच्या हाती लागली असून तिची बाजारात किंमत तब्बल पाच लाख रुपयांवर असल्याचे समोर आले आहे. नागपुरी गेट पोलिस ठाण्याच्या डिबी पथकाने गुप्त माहितीनुसार पठाण चौकाजवळील तारखेडा गेट परिसरात शनिवारी संध्याकाळी धाड टाकून ही कारवाई केली. या वेळी पोलिसांनी प्रतिक प्रभाकर पुनटकर (रा. कोंढाळी, नागपूर) याला अटक केली, तर त्याच्यासोबत असलेला अतिक खान (रा. नागपूर) अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी नागपुरी गेट पोलिसांना माहिती मिळाली की, पठाण चौक परिसरात दोन जण विक्रीसाठी चरस घेऊन उभे आहेत. तत्काळ पोलीस ठाण्याचे डीबी पथक घटनास्थळावर दाखल झाले. पोलिस पथक पाहताच दोघांपैकी अतिक खान हा पळून गेला. मात्र प्रतिक पुनटकर याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडील पिशवीची झडती घेतली असता एक किलो चरस आढळले. बाजारात या अंमली पदार्थाची किंमत तब्बल पाच लाख रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात आले.
शहरात यापूर्वी एमडी प्रतिबंधित पदार्थाच्या खेप हाती लागल्या होत्या. मात्र चरसच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेल्या कारवाईमुळे या अमली पदार्थांच्या विक्री आणि तस्करीचे नवे जाळे उघड झाले आहे. पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण शहरात अंमली पदार्थांविरोधात व्यापक मोहीम सुरू असून या कारवाईत नागपुरी गेट पोलिस स्टेशनच्या डीबी पथकातील पोहकां राजेंद्र पिंपळे, पोकां शफीक शेख, शेखर गायकवाड आणि कुणाल बर्डे यांनी महत्वाची भूमिका बजावली. या धाडसी कारवाईनंतर पोलीस अंमली पदार्थांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करीत असून फरार अतिक खानच्या मागावर संपूर्ण तपास केंद्रित करण्यात आलाय.

संबंधित बातम्या

Back to top button