मुसळधार पावसाच्या साक्षीने ‘विदर्भाचा राजा’ला भावपूर्ण निरोप
पावसाच्या सरी झेलत उसळला लोकसागराचा

-श्रद्धा आणि परंपरेचा संगम, गणेशभक्तांचा उत्साह
-अमरावतीत सजला शोभायात्रेचा ऐतिहासिक सोहळा
अमरावती / 11 सप्टेंबर : आभाळ फाटून कोसळणार्या पावसाच्या धारांनी गुरुवारी संध्याकाळचे आकाश थैमान घातले होते. विजांचा कडकडाट, पावसाचा तडाखा, रस्त्यावर साचलेले पाणी… सगळ्याचा विसर पाडून अमरावतीकर एका आवाजात ओरडत होते – गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! हा तो क्षण होता जेव्हा ‘विदर्भाचा राजा’ म्हणून मान्यता पावलेला खापर्डे बगिचा परिसरातील न्यू आझाद मंडळाचा श्री गणेश आपले निजधाम गाठण्यासाठी मार्गस्थ झाला.
खापर्डे बगिचा परिसरातील महालासारख्या पांडालात दुपारी झालेल्या महाआरतीत हजारो भाविकांची हजेरी होती. या महाआरतीचा मान दैनिक अमरावती मंडलचे संपादक व न्यू आझाद गणेशोत्सव 2025 चे अध्यक्ष अनिल अग्रवाल, तसेच मंडळाचे अध्यक्ष व माजी नगरसेवक दिनेश बूब यांना लाभला. यावेळी पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, उपायुक्त गणेश शिंदे, माजी महापौर विलास इंगोले, काँग्रेस शहराध्यक्ष बबलू शेखावत आदी मान्यवरही उपस्थित होते. थरथरणार्या ज्योतींच्या प्रकाशात, शंख-घंटांच्या निनादात आणि भक्तांच्या ओल्या डोळ्यांतून एकच भावना उमटत होती… बाप्पा, पुन्हा या!
शोभायात्रा सुरू होताच आभाळ कोसळले. जोरदार वारा, गडगडाट आणि पावसाच्या धारांनी वातावरण भारावले. पण भक्तांच्या उत्साहाला ओल लागली नाही. उलट पावसाच्या प्रत्येक सरीने जणू भक्तीचा उत्साह आणखी उंचावला. ढोल-ताशांच्या दणदणाटात, बॅण्डच्या सुरावटीत आणि जयघोषांच्या लाटांमध्ये 21 फूट उंच ‘विदर्भाचा राजा’ ट्रॉलीवरून पुढे सरकत राहिला. रेल्वे उड्डाणपुल बंद असल्याने विसर्जन यात्रेचा मार्ग बदलावा लागला. पण राजकमल चौकातली महाआरती हीच खरी विसर्जनाची प्राणप्रतिष्ठा या श्रद्धेला डोळ्यासमोर ठेवून मंडळाने दीड किलोमीटरचा अतिरिक्त फेरा मारत परंपरा जिवंत ठेवली.
खापर्डे बगिचा, इर्विन चौक मर्च्युरी टी पॉईंट, मालवीय चौक, जयस्तंभ चौक, श्याम चौक मार्गे शोभायात्रा राजकमल चौकात पोहोचली. यात्रेच्या मार्गावर प्रत्येक ठिकाणी भक्तीचा सोहळा खुलला होता. स्वराज्य पथक, छत्रपति पथक, शौर्यरुद्र पथक यांसह डझनभर ढोल पथकांच्या तालावर शहर दुमदुमले होते. विविध ऐतिहासिक व सांस्कृतिक झांक्यांनी या मिरवणुकीला अधिक देखणेपणा दिला. जोरदार पाऊस, पाण्याने भरलेले रस्ते… पण अमरावतीकरांसाठी हे काहीच नव्हते. हजारो भाविक ओल्या कपड्यांत, पावसाच्या धारांमध्ये निथळत असतानाही फक्त एकच गोष्ट अनुभवत होते… श्रद्धा हीच खरी शक्ती!
या महाकाय सोहळ्याला सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस व वाहतूक शाखेने कमालीचा बंदोबस्त ठेवला होता. पावसात भिजत, तासन्तास उभे राहून अधिकारी-कर्मचारी व्यवस्था नीट राखताना दिसले. अमरावतीच्या हृदयाला भिडणारा हा सोहळा फक्त विसर्जन नव्हता; तो होता श्रद्धा, परंपरा आणि सांस्कृतिक ऐक्याचा महोत्सव. झमाझम पावसाने जरी शहराला भिजवले, तरी भक्तीच्या ओल्या डोळ्यांनी आणि अथांग गर्दीने अमरावतीचा आत्मा पुन्हा एकदा जागवला.
-राजकमल चौकात महाआरतीचा दिव्य सोहळा
रात्री आठ वाजता राजकमल चौकात होणारी विदर्भाच्या राजाची महाआरती म्हणजे अमरावतीच्या सांस्कृतिक ओळखीचा आत्मा ठरला आहे. आज बाप्पाचे राजकमल चौकात आगमन झाल्यानंतर हजारो गणेशभक्त अबालवृद्ध महिला पुरुष व प्रामुख्याने तरुणाईच्या भावपूर्ण उपस्थितीत सजलेला महाआरतीचा सोहळा खर्या अर्थाने दैदीप्यमान होता. गणेशोत्सवाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली. यावेळी खासदार बळवंत वानखडे, माजी मंत्री जगदिश गुप्ता, माजी महापौर विलास इंगोले, अॅड. प्रशांत देशपांडे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष बबलू शेखावत, दिनेश बूब यांच्यासह असंख्य मान्यवरांची उपस्थिती होती. महाआरतीनंतर प्रसादाचे वाटप झाले आणि त्यानंतर मोसिकॉल परिसरातील विहिरीत बाप्पाचे विसर्जन करुन निरोप देण्यात आला.




