लिंगायत : जात नाही तर धर्म?

नव्या वादाची ठिणगी

-राजकारण आणि समाजावर होणार परिणाम
मुंबई / 8 सप्टेंबर : देशभरातील सामाजिक आणि राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा तापलेला वाद उफाळून आला आहे. लिंगायत समाजाने स्पष्टपणे सांगितले आहे की, लिंगायत ही जात नाही तर स्वतंत्र धर्म आहे. या मागणीमुळे केवळ कर्नाटकच नाही तर महाराष्ट्रातील राजकीय गणितही हलचालीत आले आहे.
कर्नाटक सरकारने नुकतेच सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षण जाहीर केले आहे. त्यानुसार, अपेक्स बॉडी ऑफ लिंगायत कम्युनिटीने आपल्या सर्वेक्षणात हिंदू म्हणून नाही तर ‘वीरशैव लिंगायत’ म्हणून नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. या घोषणेनंतर देशभरात एकच खळबळ उडाली आहे. लिंगायत समाजाला स्वतंत्र धार्मिक मान्यता हवी आहे. संविधानिक मान्यता दिल्यास, देशाच्या राजकारणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता. भाजपच्या हिंदू व्होट बँकेला त्यातून मोठा धक्का बसू शकतो.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मात्र या मागणीवर विरोध नोंदवला आहे. ते म्हणाले की, लिंगायत समाज हा हिंदू संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. महाराष्ट्रातही ही मागणी पसरत आहे. राज्यातील 8 जिल्ह्यांत लिंगायत समाजाची लोकसंख्या अंदाजे 85 लाख इतकी आहे. लिंगायतबहुल जिल्ह्यांमध्ये सोलापूर, कोल्हापूर, सांगली, लातूर, नांदेड, हिंगोली, धाराशिव, यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे. लिंगायत समाज फक्त स्वतंत्र धर्म म्हणून मान्यताच नव्हे, तर अल्पसंख्याक म्हणूनही दर्जा मिळावा, अशी मागणी करत आहे. कर्नाटकात लिंगायत समाज 17 टक्के तर महाराष्ट्रात 9 टक्के लोकसंख्या आहे. जर त्यांना स्वतंत्र धार्मिक ओळख मिळाली, तर राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोठी फेरफार होऊ शकते.

संबंधित बातम्या

Back to top button