राजकमल पुल बंदीवरुन सुनील देशमुखांची परखड टीका
प्रशासनाच्या निर्णयप्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

-सौंदर्यीकरणाच्या अनाठायी खर्चावरुन संताप
-लोकप्रतिनिधींच्या जबाबदारीवरही सवाल
अमरावती / 8 सप्टेंबर : शहराच्या पूर्व व पश्चिम भागांना जोडणारा महत्वाचा राजकमल चौक रेल्वे उड्डाणपुल अचानक बंद करण्यात आला असून यामुळे नागरिक आणि वाहनचालक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत. या निर्णयावर काँग्रेसचे नेते आणि माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी प्रशासनावर तसेच संबंधित लोकप्रतिनिधींवर थेट व परखड टीका केली आहे.
यासंदर्भात डॉ. सुनील देशमुख यांनी म्हटले आहे की, उड्डाणपुल पाडायचाच होता तर आधी सौंदर्यीकरणासाठी अडीच कोटी रुपये का खर्च केले गेले. प्रशासन निर्णय प्रक्रियेत पारदर्शक नाही, ‘हम करे सो कायदा’ अशी अवस्था निर्माण झाली आहे. पुलाचे संपूर्ण पाडकाम होईल की फक्त रुळावरील सांधा बदलला जाईल, याबाबत नागरिक आणि लोकप्रतिनिधींना काहीही माहिती नाही. पुलाच्या अचानक बंदीमुळे शहरातील वाहतूक ठप्प झाली आहे. रोजच्या प्रवासावर आणि व्यवसायावर मोठा परिणाम होत आहे. पुलाची स्थिती नादुरुस्त असूनही सौंदर्यीकरणावर खर्च करणे पूर्णत: अव्यवहार्य होते, असा आरोप डॉ. सुनील देशमुख यांनी गंभीर प्रश्न उपस्थित करताना केला आहे.
कोणत्याही उपाययोजनांविना राजकमलचा पुल बंद झाल्याने अमरावती शहरवासीयांना रोजच्या प्रवासात मोठा अडथळा येतोय. प्रशासनाने आधीच माहिती द्यायला हवी होती. सौंदर्यीकरणावर पैसे खर्च करून पुल पाडणे प्रश्नार्थक आहे आणि वाहतूक बंदीमुळे व्यवसायावरही परिणाम होत आहे. महानगरपालिकेच्या अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार पुलाची संरचनात्मक स्थिती अत्यंत खराब आहे, सुरक्षिततेसाठी तातडीने वाहतूक बंद करणे आवश्यक होते, उड्डाणपुलाचा तोडकाम किंवा दुरुस्ती निर्णय तांत्रिक अहवालानुसार होईल, तज्ञांचे म्हणणे आहे की पुलाची काँक्रिट संरचना दुरुस्त करण्यायोग्य नाही, वेळेवर देखभाल, संरचनात्मक लेखापरीक्षण आणि दुरुस्ती न झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. या सगळ्या मुद्यांच्या पार्श्वभूमिवर डॉ. सुनील देशमुख यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर थेट टीका केली असून प्रशासनाची भूमिका अजिबात पटण्यासारखी नसल्याचे म्हटले आहे. े
लोकप्रतिनिधींच्या अनभिज्ञतेमुळे पुलाच्या भवितव्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. सौंदर्यीकरणावर खर्च, राजकीय पाठपुरावा न होणे, तांत्रिक अहवालातील गंभीर स्थिती, वाहतूक ठप्प होणे, नागरिकांचा संताप आणि प्रशासनाचे अधिकृत स्पष्टीकरण ह्या सर्व बाबी एकाच माळेत समोर येतात आणि उड्डाणपुलाच्या भवितव्यावर लक्ष ठेवणे महत्त्वाचे ठरते, असे डॉ. सुनील देशमुख यांनी म्हटले आहे.
-…तर पुल शंभर वर्ष टिकला असता
पुलाची नियमित देखभाल केली असती, वेळेवर संरचनात्मक लेखापरीक्षण करून दुरुस्ती केली असती तर हा पुल शंभर वर्षे टिकला असता. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आज पाडकामाची वेळ आली आहे. पुलाच्या नादुरुस्तीची माहिती दोन वर्षांपूर्वीच त्यावेळच्या भाजपच्या खासदारांना होती. पण पाठपुरावा का केला गेला नाही यावरुन डॉ. सुनील देशमुख यांनी तिखट प्रतिक्रिया देत संबंधित जनप्रतिनिधींवर टीका केली. तसेच जनप्रतिनिधींच्या राजकिय जबाबदारीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.




