मुलगी घेऊन आल्याच्या संशयावरून व्यापार्याची हत्या
अल्पवयीनासह सहा आरोपी गजाआड

-अकोल्याच्या मलकापूर परिसरातील घटना
अकोला / 1 सप्टेंबर : शहरातील मलकापूर येथील रेल्वे बोगद्याजवळ घडलेल्या धक्कादायक घटनेने परिसर हादरला आहे. औद्योगिक वसाहतीतील व्यापारी सुफियान खान (रा. अकोला) यांची काही संशयित तरुणांनी निर्जनस्थळी बेदम मारहाण करून हत्या केली. धुम्रपान करण्यासाठी गेलेल्या व्यापार्यांवर तुम्ही मुलगी घेऊन आला आहात का? असा संशय घेऊन हल्ला करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी वेगाने कारवाई करून 12 तासांच्या आत सर्व आरोपींना गजाआड केले असून त्यात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे.
सुफियान खान, साजिद खान व मोहम्मद कैफ बक्शउल्ला खान हे व्यापारी आपल्या मोटारीने मलकापूर येथील रेल्वे बोगद्याजवळ गेले होते. तिथे ते तिघे धुम्रपान करीत असतानाच चार जण अचानक आले. येथे मुलगी घेऊन आले आहे का? अशी विचारणा करताच चौघांनी त्यांना शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. सुफियान खान यांनी मदतीसाठी कारखान्यातील इतरांना बोलावून आणण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यादरम्यान आरोपींनी सुफियान व साजिद यांना जबर मारहाण केली. त्यात सुफियानवर चाकूने वार करण्यात आले. गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर अकोल्याचे पोलिस अधीक्षक आर्चित चांडक यांनी तत्काळ स्थानिक गुन्हे शाखेला तपासाची सूत्रे सोपवली. घटनास्थळी कोणताही सीसीटीव्ही फुटेज नसणे, आरोपींची स्पष्ट ओळख किंवा मोबाईल लोकेशन उपलब्ध नसल्याने तपास आव्हानात्मक होता. मात्र, पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने गुप्त माहिती, तांत्रिक तपासणी व सर्व बाजूंनी चौकशी करून आरोपींचा माग काढला.
पोलिसांनी वाशीम बायपासवरून फैजान खान मुर्शरफ खान (रा. हाजी नगर, अकोला), अब्दुल अरबाज अब्दुल इस्माईल (रा. ताज चौक, इंदीरा नगर, अकोला), शोएब अली उर्फ राजा तैयब अली (रा. सैयदपुरा, अकोला) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार एक पथक शेगाव येथे रवाना झाले व उर्वरित आरोपी शेख अस्लम शेख अकबर, सैय्यद शहबाज उर्फ सोनु सैय्यद मुजीब तसेच एका अल्पवयीन मुलाला दुचाकीसह अटक करण्यात आले.




