अजूनही संधी आहे, नाहीतर परिणाम भोगावे लागतील
मनोज जरांगेचा फडणवीसांना इशारा

-मराठा आंदोलनकांना संयमाचे आवाहन
-मराठा आरक्षणासाठी ठाम भूमिका
मुंबई / 28 ऑगस्ट : मराठा आरक्षणासाठी ठाम पद्धतीने लढणारे मनोज जरांगे पाटील आज जुन्नरमधून मुंबईकडे निघाले. किल्ला शिवनेरीच्या पायथ्याशी नतमस्तक होऊन, मनोज जरांगे यांनी आंदोलनाच्या रणभूमीकडे ठाम पावलं टाकली. मुंबईकडे निघण्याआधी त्यांनी मराठा बांधवांसोबत संवाद साधला आणि पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांसाठी जोरदार इशारा दिला.
मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले, अजूनही तुमच्या हातातून वेळ गेली नाही. गोरगरिबांची मनं जिंकण्याची संधी तुमच्याकडे आहे. तुम्ही आमचे वैरी नाहीत, शत्रू नाहीत. फक्त आठमूठे भूमिका सोडून द्या, नाहीतर परिणाम भोगावे लागतील. ते म्हणाले की आंदोलनासाठी एक दिवसाची वेळ देणं चेष्टा आहे, परंतु मागण्या मान्य केल्याशिवाय ते मागे हटणार नाहीत. समाजाच्या वेदना मुख्यमंत्री समजून घेतील यावर जरांगेंचा विश्वास आहे. आम्ही आरक्षणासाठी भांडत आहोत, तेही शांततेच्या आणि लोकशाही मार्गाने. आरक्षण दिल्यानंतर मराठा समाज सन्मान करेल. आताच अंमलबजावणी करा. सत्ता दिली मराठ्यांनी, उलटले मराठ्यांवरच. समाज जाणून-बुजून टार्गेट केला जात आहे, असे मनोज जरांगे यावेळी म्हणाले.
मनोज जरांगे म्हणाले, 29 ऑगस्टपासून सकाळी आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू करणार आहे. मराठ्यांनी संयम राखावा, कोणतीही चूक करू नये. आंदोलनात खंड पडू नये. ते म्हणाले की अटी-शर्थी न घालता आंदोलनासाठी येणार्यांना सहभागी होऊ द्यावे. मनोज जरांगे यांनी सांगितले की, पत्नी-मुलं रडली, मुलीला चक्कर आली, तरीही आंदोलनाच्या रणभूमीकडे पावलं ठाम पाडली. गडबड गोंधळ करू नका, संयम राखून लढा. मनोज जरांगे यांनी आज या पत्रकार परिषदेतून स्पष्ट संदेश दिला. निर्णय घेण्यात उशीर करू नका, मराठा समाजाला न्याय मिळावा, आणि आंदोलनासाठी एकजूट व संयम राखणे अनिवार्य आहे. असे त्यांनी सरकारला ठणकावले आहे.
-मोदी आणि शाहच बदलतील सरकार
जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना राज्य सरकार उलथवून टाकण्याचा इशारा दिला. जरांगे म्हणाले, राज्यातल्या सरकारची उलथापालथ आमही नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हेच करणार आहेत. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मोदी आणि शाहांवर दबाव असेल तर तेच राज्य सरकार बदलतील. जरांगे म्हणाले, गोरगरीब पोरं पावसात मोटरसायकलवरून येतात. यात खूप वेदना आहेत. फडणवीस साहेबांनी हे लक्षात घेणे गरजेचे आहे. आम्ही न्यायासाठी लढत आहोत; आम्ही शत्रू नाही.
-आझाद मैदानात पोलिस छावणी
मोर्च्यामुळे आझाद मैदानाला छावणीसारखे स्वरूप आले आहे. तिथे 1000 पोलीस कर्मचारी तसेच राखीव जवान तैनात आहेत. जरांगे म्हणाले, आंदोलन नियमांमध्ये राहून करणार आहोत; परवानगी मिळेपर्यंत उपोषण चालू राहील. कायद्याचे पालन होईल, पण आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही.




