मुसळधार पावसाने हाहाकार, मृतांचा आकडा वाढला
मुंबई, विदर्भ-मराठवाड्यात पूर परिस्थिती

-रेल्वे व विमान सेवा विस्कळीत
-प्रशासनाचा अलर्ट, पुढील दोन दिवस निर्णायक
मुंबई / 19 ऑगस्ट : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन अक्षरशः ठप्प झाले आहे. मुंबई, ठाणे, पुणे, सातारा, कोल्हापूर, नांदेड, बीड, चंद्रपूर या जिल्ह्यांत पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. अनेक नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली असून पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय हवामान खात्याने मुंबईसह राज्यातील काही भागांसाठी ऑरेंज अलर्ट, तर कोकण व घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे.
मुसळधार पावसामुळे विविध दुर्घटनांमध्ये गेल्या दोन दिवसांत राज्यभरात 7 ते 8 जणांचा मृत्यू झाला आहे. नांदेड जिल्ह्यातच आठ मृत्यूंच्या घटना घडल्या असून, ढगफुटीसदृश पावसाने येथे सर्वाधिक हानी केली. बीडमध्ये पाण्यात गाडी अडकल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला; तर विदर्भात पूरपाण्यात दोन जणांना जीव गमवावा लागला. याशिवाय, मराठवाड्यात 11 जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई व उपनगरांत गेल्या 84 तासांत 500 मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. सायन, किंग्ज सर्कल, दादर, कंजुरमार्ग या सखल भागात पाणी साचल्याने वाहनांची चेंगराचेंगरी झाली.
लोकल रेल्वे गाड्या 30-45 मिनिटे उशिराने धावत आहेत; अनेक गाड्या रद्दही करण्यात आल्या. मुंबई विमानतळावर 50 पेक्षा जास्त उड्डाणे उशिरा धावली, काही विमाने अन्यत्र वळवण्यात आली. सातारा, पुणे, कोल्हापूर जिल्ह्यांत कृष्णा, वारणा, नीरा नद्यांचे पाणी धोक्याच्या पातळीवर आले आहे. धरणांतून विसर्ग सुरू असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यांतही पूरस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या 84 तासांत मुंबई – 500 मिमी, ठाणे – 210 मिमी, पुणे – 150 मिमी, सातारा – 200 मिमी, विदर्भ – 120-180 मिमी पाउस झाला.
-बचाव पथके तैनात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, राज्यात 12 ते 14 लाख हेक्टर शेतीवर पावसाचा तडाखा बसला आहे. सोयाबीन, कापूस, तूर या पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकर्यांपुढे संकट उभे राहिले आहे. पावसाची तीव्रता लक्षात घेऊन एनडीआरएफची 18, एसडीआरएफची 6 पथके तैनात आहेत. मुंबईतील सायन, कुर्ला परिसरातून शेकडो लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. बीएमसीकडून पाणी उपसा सुरू असून शाळा-कॉलेजांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पुढील 48 तास अत्यंत निर्णायक आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.
-8 मृत्यु, अनेकजण बेपत्ता
मुसळधार पावसामुळे राज्यभर 8 जणांचा मृत्यू झाला. तर मराठवाड्यात 11 जण बेपत्ता आहेत. मुंबई मुंबईत अंगावर भिंत कोसळून व विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्याने दोघा जणांचा मृत्यु झाला. नांदेड मधये दांपत्यासह 5 जण मृत्युमुखी पडले. बीड जिल्ह्यात एकाचा तर विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यात 2 जणांचा मृत्यु झाल्याची माहिती मिळाली आहे.




