डबे मागे, इंजिन पुढे : मालगाडीचे कपलिंग तुटले, अनर्थ टळला

वंदे भारत एक्स्प्रेसला अडथळा, प्रवाशांचे हाल

-मुर्तिजापूरनजीक दोन तास खोळंबली गाडी
अकोला / 17 ऑगस्ट : नागपूर ते पुणे धावणार्‍या देशातील सर्वात लांब पल्ल्याच्या वंदे भारत एक्स्प्रेसचा प्रवास रविवारी तब्बल दोन तास ठप्प झाला. अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजूजवळ मालगाडीचे कपलिंग अचानक तुटल्याने रेल्वे दोन भागांत विभागली. काही डबे मागे राहिले, तर इंजिनसह उर्वरित डबे पुढे गेले. या प्रकारामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून, मूर्तिजापूर स्थानकाजवळ वंदे भारत एक्स्प्रेस थांबवावी लागली. ज्या स्थानकावर या गाडीला अधिकृत थांबा नाही, तिथे तब्बल दोन तास प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागली.
नागपूरहून मुंबईकडे जाणार्‍या धावत्या मालगाडीचे कपलिंग अचानक तुटले. त्यामुळे मालगाडीचे डबे आणि गार्ड मागे राहिले, तर इंजिन व काही डबे काही अंतर पुढे निघून गेले. हा प्रसंग पोल क्रमांक 599/12 जवळ घडला. सुदैवाने रेल्वे पायलटने प्रसंगावधान राखून वेग नियंत्रित केला आणि मोठा अपघात टळला. या दुर्घटनेमुळे नागपूर-मुंबई रेल्वे मार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसला मूर्तिजापूर येथे थांबवण्यात आले. नियोजित थांबा नसतानाही तब्बल दोन तास प्रवासी रेल्वेतच थांबले. लांब पल्ल्याच्या प्रवासात अचानक झालेल्या या विलंबामुळे प्रवाशांची गैरसोय झाली.
रेल्वे प्रशासनाने घटनास्थळी पोहोचून तातडीने दुरुस्ती सुरू केली. स्थानकातील गार्ड आणि इंजिन चालकांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवले. प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे की वेळेत खबरदारी घेतल्याने मोठा अनर्थ टळला.

संबंधित बातम्या

Back to top button