धारणीत नकली नोटांचे सावट, 500 च्या हुबेहुब नोटा

निष्पाप नागरिक फसवणुकीचे बळी

– मुख्य बाजारपेठा बनल्या केंद्रबिंदू
धारणी / 1 ऑगस्ट : धारणी व परिसरातील आदिवासी व ग्रामीण भागात बनावट 500 च्या नोटांचा सुळसुळाट झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे. हुबेहुब छापलेल्या या नकली नोटांमुळे किरकोळ व्यापारी, दुकानदार आणि सामान्य ग्राहक आर्थिक फसवणुकीला सामोरे जात आहेत. धारणी शहरातील मुख्य बाजारपेठ, किराणा दुकानं, व पेट्रोल पंपांवर अशा बनावट नोटा आढळून आल्याने व्यापार्‍यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. हे चलन इतकं वास्तववादी आहे की सामान्य नागरिकाला त्यातील फरक समजणे अत्यंत कठीण जात आहे.
ग्रामीण व आदिवासी भागांतील नागरिक डिजिटल किंवा आधुनिक सुरक्षा प्रणालीपासून दूर असल्याने या हुबेहुब नोटा सहज स्वीकारतात. व्यवहारानंतर नकली असल्याचे लक्षात आल्यावर त्यांचं नुकसान मात्र अटळ ठरतं आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, या प्रकारामागे बाहेरील टोळ्यांचा हात असण्याची शक्यता आहे. शहरी भागांतील टोळ्यांनी मेलघाटसारख्या आदिवासी भागांत प्रवेश केल्याचं चित्र आहे. पोलिसांच्या कमी उपस्थितीचा फायदा घेत हे टोळके धाडसीपणे कारवाया करत असल्याचं समजतं आहे. पोलिस प्रशासन व महसूल विभागाने नागरिकांना बाजारात व्यवहार करताना नोटांची नीट तपासणी करण्याचे आवाहन केले आहे. कुठलीही संशयास्पद नोट किंवा व्यक्ती दिसल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रशासन लवकरच ग्रामपंचायती, बाजारपेठा आणि शाळांमध्ये जनजागृती मोहिमा राबवण्याची तयारी करत आहे. नागरिकांमध्ये नकली नोटांविषयी जागरूकता वाढवणे हे सध्या अत्यावश्यक बनले आहे. धारणीसारख्या शांत, आदिवासी भागात नकली नोटांचे सावट पसरल्याने केवळ आर्थिकच नव्हे तर सामाजिक अस्थिरतेचा धोका निर्माण झाला आहे. संबंधित यंत्रणांनी तातडीने पावले उचलणं आवश्यक असून, नागरिकांनीही सावध राहून स्वतःचं आणि समाजाचं संरक्षण करणं गरजेचं आहे.

संबंधित बातम्या

Back to top button