अमरावती टेक्सटाईल पार्कमध्ये आता 600 रुपये दराने भूखंड
उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा

-आ. संजय खोडके यांनी उचलला मुद्दा
-भारत डायनामिक्स, रेमंड उद्योगावरही चर्चा
अमरावती / 18 जुलै : अमरावतीच्या मेगा टेक्सटाईल्स पार्कमध्ये उद्योग उभारण्याला कंपन्यांकडून प्राधान्य दिले जावे या उद्देशाने येथील भूखंडाचे दर आता 1300 रुपयांऐवजी 600 रुपये प्रती चौरस फुट करण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज पावसाळी अधिवेशनादरम्यान विधान परिषद सभागृहात बोलताना दिली. विधान परिषद सदस्य संजय खोडके यांनी याबाबतचा मुद्दा उपस्थित करुन भूखंडाच्या अवास्तव दरांमुळे उद्योजक या संकुलाकडे पाठ फिरवित असल्याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. त्यावर उत्तर देताना उदय सामंत यांनी ही माहिती दिली.
विधानपरिषदेच्या कामकाजादरम्यान आ. संजय खोडके यांनी अमरावतीच्या औद्योगिक विकासासंदर्भात अनेक मुद्दे उपस्थित केले. टेक्सटाईल्स पार्कसोबतच खोडके यांनी भारत डायनामिक्स व रेेमंड या अमरावती औद्योगिक वसाहतीमधील मोठ्या उद्योगासंबंधीचे प्रश्न सभागृहात मांडले. त्या अनूशंगाने उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अमरावतीच्या औद्योगिक विकासाबाबतीत सरकारची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, संजय खोडके यांनी अमरावती मेगा टेक्स्टाईल पार्क, भारत डायनॅमिक्स व रेमन्ड उद्योगांबाबत मांडलेले प्रश्न विदर्भाच्या विकासाच्यादृष्टीने अत्यंत महत्वाचे आहेत. याबाबत शासन सकारात्मक भूमिका घेणार आहे.
अमरावतीच्या अतिरिक्त औद्योगिक वसाहतीमधील पीएम मित्र मेगा टेक्स्टाईल पार्कमध्ये जागेचे दर 1300 रुपये चौरस फूट असल्याने मोठे उद्योजक उद्योग उभारणीसाठी अनास्था दाखवित आहेत. त्यामुळे येथील जागेचे दर कमी करण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या नेतृत्वात शासनाने निर्णय घेऊन अमरावतीच्या मेगा टेक्स्टाईल पार्कमधील जागेचे दर 1300 वरून 600 रुपये चौरस फूट करण्याचा निर्णय घेतला आहे. भूखंडाचे दर कमी झाल्याने अमरावतीचा पीएम मेगा टेक्स्टाईल पार्क आत चांगल्या पद्धतीने विकसित होईल, असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला.
अमरावतीच्या औद्योगिक वसाहतीत उद्योग उभारणीसाठी सर्व नैसर्गिक व भौतिक संसाधने उपलब्ध आहेत. पाणी, वीज मूबलक आहे. दळणवळणाच्या सोयी व मनुष्यबळ तसेच गुंतवणूकदार सुद्धा आहेत. तरीही अमरावतीची औद्योगिक क्षेत्रात पीछेहाट झाल्याने दरडोई उत्पन्न महाराष्ट्रात सर्वात कमी आहे. जिल्ह्यातील उद्योगांची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. शासनाने अमरावतीमध्ये उद्योगांच्या बाबतीत सुयोग्य धोरण ठरविणायची गरज असल्याचे विवेचन आ. संजय खोडके यांनी केले.
अमरावती जिल्ह्यात उद्योग व परिणामी रोजगाराचा मोठा अनुशेष निर्माण झाला आहे. स्टार्टअपच्या माध्यमातून नवीन व्यवसायांना चालना देण्याची येथे नितांत गरज असल्याचे खोडके म्हणाले. जिल्ह्यात उद्योगांच्या बाबतील क्लस्टर निर्माण केल्यास त्यातून गुंतवणुकीला चालना मिळणार असून उद्योगांच्या भरभराटीने आसपासच्या जिल्ह्यांवर सुद्धा विकासाचे प्रतिबिंब निश्चित उमटणार असल्याचे, आ. संजय खोडके म्हणाले.




