सासरच्या जाचाला कंटाळून महिलेची आत्महत्या

पतीसह सासरा व दिरावर गुन्हा

अमरावती / 10 जुलै: माहेरुन पैसे आणण्याचा तगादा लावून पती, सासरा आणि दिराकडून दिल्या जात असलेल्या शारीरिक व मानसिक जाचाला कंटाळून एका 27 वर्षीय विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना धामणगाव रेल्वे तालुक्यातील रामनगर, हिरापूर येथे घडली. मृतक महिलेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन दत्तापूर पोलिसांनी तिन्ही आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
पुजा योगेश खडतकर असे मृतक महिलेचे नाव आहे. तिला 18 महिने वयाची मुलगीसुद्धा आहे. पुजाचा विवाह रामनगर, हिरपूर येथील रहिवासी असलेल्या योगेश संजय खडतकर (32) याच्यासोबत सहा वर्षांपूर्वी झाला होता. त्यांना मुलगीही झाली. सुरुवातीला सासरच्यांनी पुजाला चांगली वागणूक दिली. मात्र काही वर्षांपासून पती योगेश, दिर अतुल खडतकर (28) आणि सासरा संजय रुपराव खडतकर (62) यांनी तिला त्रास द्यायला सुरुवात केली. माहेरुन पैसे आणण्याचा तगादा लावून ते तिला मारहाण करायचे आणि मानसिकदृष्ट्याही त्रास देत होते.
या त्रासाला कंटाळून पूजाने मंगळवारी आपल्या राहत्या घरी गळफास घेउन आत्महत्या केली. पूजाच्या आईने याबाबत दत्तापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याआधारे पोलिसांनी तिन्ही आरोपींवर कौंटुंबिक हिंसाचारासह आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button