गळा आवळून 30 वर्षीय युवतीची हत्या
शिरजगाव कसबा येथील घटना

-पुलाखाली आढळला मृतदेह, मृतक अनोळखी
-हात-पाय बांधून ब्लँकेटमध्ये गुंडाळले
अमरावती / 10 जुलै: चांदुर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा पोलिस ठाण्याच्या हद्दीत शिरजगाव – ब्राह्मणवाडा मार्गावर एका पुलाखाली अंदाजे 25 ते 30 वर्षीय अनोळखी युवतीचा मृतदेह संयशास्पद स्थितीत आढळून आल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. तरुणीच्या गळ्यावर आवळल्याचे व्रण आढळून आले तसेच तिचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय कपड्याने बांधलेले होते व मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळलेला होता. यावरुन या तरुणीची गळा दाबून हत्या केल्यानंतर आरोपीने मृतदेह या निर्जनस्थळी आणून टाकला असल्याचे स्पष्ट होत आहे. शिरजगाव कसबा पोलिसांनी सुरुवातीला मृतक महिलेची ओळख पटविण्यासाठी तपास प्रारंभ केला आहे.
शिरजगाव पासून काही अंतरावर ब्राह्मणवाडा गावाकडे जाणार्या रस्त्यावरील एका नाल्यावर लहान पुल आहे. हे ठिकाण निर्जन असून येथे फारशी वर्दळ नाही. अशातच आज दुपारी अडिच वाजताच्या सुमारास काही लोकांना एका ब्लँकेटमध्ये काहीतरी गुंडाळलेले दिसले. त्यातून काही प्रमाणात दुर्गंधीही येत होती. या लोकांनी कुतूहलाने जवळ जावून पाहीले असता त्यांना संशय आला. ब्लँकेट थोडे बाजूला केल्यावर त्यांना त्यात महिलेचा मृतदेह आढळून आला. याबाबत शिरजगाव कसबा पोलिसांना सुचना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले.
पोलिसांनी पुलाखालून ब्लँकेटमध्ये गुंडाळलेला मृतदेह बाहेर काढला, तेव्हा मृतक महिलेचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय कपड्याने करकचून बांधलेल्या अवस्थेत आढळून आले. या युवतीचे वय 25 ते 30 वर्षे असावे, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. तिच्या गळ्यावर आवळल्याच्या खुना आढळून आल्या. महिलेचा मृत्यु चार ते पाच दिवसांपूर्वी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कुणीतरी तिचे हात-पाय बांधून कपड्याने गळा आवळला व या युवतीची हत्या केली. त्यानंतर गुन्हा लपविण्याच्या उद्देशाने मृतदेह या निर्जनस्थळी पुलाखाली आणून टाकला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अचलपूर येथे उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. रात्री उशिरा याप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. प्रारंभ या अनोळखी मृतक युवतीची ओळख पटविण्याचे आव्हान ग्रामीण पोलिसांसमोर आहे. त्यादृष्टीने तपास सुरु करण्यात आला आहे.
-मृतक विवाहित व सधन घरातील?
मृतक युवतीने अंगावर पिवळ्या रंगाचे ब्लाउज आणि पिवळ्याच रंगाची साडी परिधान केली होती. हातात हिरवट सोनेरी रंगाच्या बांगड्या आणि पायात पैंजणही होते. एकुणच राहणीमानावरुन ही युवती विवाहित आणि चांगल्या घरातील असण्याची शक्यता आहे. तिच्या उजव्या हातावर इंग्रजीत एएम आणि मराठीत दुर्गा तसेच इंग्रजीत अनिल असे शब्द गोंदलेले आहे. स्थानिक लोकांनी मृतक या परिसरातील नसल्याचे स्पष्ट केले आहे. बाहेरच कुठेतरी हत्या करुन मृतदेह याठिकाणी आणून टाकल्याचा संशय पोलिसांना आहे. घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक पंकज कुमावत, सहाय्यक पोलिस अधीक्षक शुभम कुमार घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.




