डॉक्टरांच्या क्रिकेट मैदानात रंगली चुरस
अमरावती, नागपूर आणि गुजरात संघांची दमदार कामगिरी

दुसर्या दिवसाच्या सामन्यांत फलंदाजी अन् गोलंदाजीचा जलवा
अमरावती /27 नोव्हेंबर- डॉक्टरांच्या मैदानातील खेळाला उत्साह, संघभावना आणि विजयाची जोड मिळाल्याने अमरावती येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय डॉक्टर क्रीडा महाकुंभात क्रिकेट सामन्यांची रंगत वाढली आहे. भारतीय वैद्यकीय संघटनेच्या अमरावती शाखेतर्फे आयोजित या स्पर्धेच्या दुसर्या दिवशी अमरावती, नागपूर, गुजरात आणि विदर्भ संघांमध्ये सामने रंगले. अमरावती युनायटेड-11 आणि नागपूर संघाने विजय मिळवला, तर गुजरात वॉरियर्सनेही दमदार खेळ करत प्रतिस्पर्ध्याला नमवले.
दुसर्या दिवसाच्या पहिल्या सामन्यात नागपूर संघाने 20 षटकांत 201 धावा उभारल्या. प्रत्युत्तरात अमरावती युनायटेड-11 संघाला 174 धावांवर रोखण्यात नागपूरला यश आले. नागपूरने 27 धावांनी विजय नोंदवला. डॉ. आदित्य खोट यांनी 4 षटकांत 31 धावा देत 3 बळी घेतले. त्यांच्या अचूक गोलंदाजीने सामन्याला निर्णायक वळण मिळाले. तनवीरने 17 चेंडूंत 38 धावा करत आक्रमक फलंदाजी केली. दुसर्या सामन्यात गुजरात वॉरियर्सने 20 षटकांत 217 धावा केल्या. विदर्भ संघाने जोरदार प्रत्युत्तर दिले; मात्र विजय मिळवण्यात त्यांना अपयश आले. गुजरातने विजयाची नोंद केली. या स्पर्धेचे उद्घाटन 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता अमरावतीच्या जिल्हा स्टेडियमवर झाले. भारतीय वैद्यकीय संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अनिलकुमार नायक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. डॉक्टरांमध्ये खेळ, आरोग्य, मैत्री आणि संघभावना वाढवण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित केली आहे.
मैदानावर डॉक्टरांचा खेळ रंगला
डॉक्टरांच्या आरोग्यपूर्ण जीवनशैलीला प्रोत्साहन देणे, मानसिक तणाव कमी करणे, मैत्री वाढवणे आणि खेळाची संस्कृती जोपासणे, हा राष्ट्रीय क्रीडा महाकुंभाचा मुख्य उद्देश आहे. 27 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या उपक्रमाला देशभरातील डॉक्टरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.





