ऑनलाईन फसवणूक करणारी टोळी जेरबंद; तिघांना अटक
सायबर विभाग व पथ्रोट पोलिसांची कारवाई

अमरावती /27 नोव्हेंबर- मेझॉन रँकिंग टास्क पूर्ण करण्याचे आमिष दाखवून तसेच क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली एका तरुणाची 6 लाख 3 हजार 739 रुपयांनी ऑनलाईन फसवणूक करणार्या टोळीचा अमरावती ग्रामीण पोलिसांच्या सायबर विभागाने आणि पथ्रोट पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात ऑनलाईन फसवणूक करणार्या दोघांसह त्यांचे बँक खाते वापरणार्या एका म्यूल खातेदाराला अटक करण्यात आली आहे.
पथ्रोट येथील वेदांत अनिल कळमकर (25) यांनी 4 जून 2026 रोजी पथ्रोट पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, आरोपींनी त्यांना मेझॉन रँकिंग बीआरबीचे टास्क पूर्ण करण्याचे आमिष दाखविले. सुरुवातीला टास्क पूर्ण केल्यानंतर त्यांच्या बँकेच्या यूपीआय खात्यावर 160 रुपये बोनस देण्यात आला. त्यामुळे फिर्यादीचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर त्यांना टेलिग्राम ग्रुपमध्ये सहभागी करून घेण्यात आले. तेथे वेगवेगळे टास्क देऊन एका संशयास्पद संकेतस्थळावर लॉगिन करण्यास सांगण्यात आले. पुढे टप्प्याटप्प्याने पैशांची मागणी करण्यात आली. तसेच कॉईनबेस कंपनीच्या माध्यमातून क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक परतावा मिळेल, असे आमिष दाखविण्यात आले. या प्रलोभनाला बळी पडून फिर्यादीने वेळोवेळी पैसे जमा केले. मात्र, त्यांची तब्बल 6 लाख 3 हजार 739 रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली.
तक्रारीवरून पथ्रोट पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 318 (4) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम 66 (सी) व 66 (डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान सायबर विभागाकडून मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी अमरावती येथील वरद सुधीर कपिले आणि कार्तिक रमेश लांडगे या दोघांना अटक केली. तसेच फसवणुकीच्या व्यवहारासाठी ज्याचे बँक खाते वापरण्यात आले, त्या सारंग प्रेमदास जोंधळे यालाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.





