राज्यातील 1,800 कर्मचार्यांच्या पदरी केवळ निराशाच
दोन दशकांची सेवा; तरीही एड्स कर्मचार्यांचे भविष्य अंधारात!

अल्प पगारात कंत्राटी नोकरीची टांगती तलवार
आरोग्य अभियानाप्रमाणेच कायम सेवेत समायोजनाची मागणी
नव्या बाह्यस्रोत धोरणामुळे सामाजिक सुरक्षेची चिंता
अमरावती/27 नोव्हेंबर – शासकीय आरोग्य योजना यशस्वी करण्यासाठी रात्रंदिवस राबणारे आणि गेल्या दोन दशकांहून अधिक काळ प्रामाणिक सेवा देणारे राज्यातील 1,800 एड्स नियंत्रण कर्मचारी आजही सेवाशाश्वतीच्या प्रतीक्षेत आहेत. अल्प वेतन, वार्षिक कंत्राटाचे नूतनीकरण आणि सामाजिक सुरक्षेच्या अभावामुळे समुपदेशक व प्रयोगशाळा तंत्रज्ञांचे भविष्य अंधारात सापडले असून राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या धर्तीवर कायम सेवेत समावून घेण्यासाठी स्वतंत्र धोरण आखण्याची जोरदार मागणी जोर धरू लागली आहे.
शासकीय आरोग्य योजनांच्या यशामागे वर्षानुवर्षे आपले रक्त आटवणार्या कंत्राटी कर्मचार्यांच्या भवितव्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत गेल्या वीस वर्षांपासून अधिक काळ
सेवा देणारे समुपदेशक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ आजही हक्काच्या नोकरीसाठी झगडत आहेत. हातावर पोट भरेल इतका अत्यल्प पगार, दरवर्षी कराराचे नूतनीकरण करण्याची टांगती तलवार, पगारवाढीतील अनिश्चितता आणि विमा व निवृत्ती वेतनासारख्या सामाजिक सुरक्षेचा पूर्ण अभाव यामुळे राज्यभरातील कर्मचार्यांमध्ये तीव्र चिंतेचे वातावरण पसरले आहे. वाढते वय आणि डोक्यावर कौटुंबिक जबाबदार्यांचा डोंगर असतानाही नोकरीच्या स्थैर्याची कोणतीही हमी नसल्याने या कर्मचार्यांचे जगणे कठीण बनले आहे.
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, एकात्मिक समुपदेशन व तपासणी केंद्रे, औषधोपचार केंद्रे, गुप्तरोग केंद्रे, रक्तपुरवठा केंद्रे तसेच कावीळ आणि इतर संसर्गजन्य आजारांवर नियंत्रण मिळवण्याचे महत्त्वाचे उपक्रम राबविले जातात. या केंद्रांमध्ये समुपदेशक नागरिकांमध्ये एड्स तपासणीबाबत जनजागृती करणे, समाजातील गैरसमज दूर करणे, रुग्णांची गोपनीयता राखणे आणि बाधित रुग्णांना पुढील उपचारांशी जोडून घेण्याचे मोलाचे काम करतात. दुसरीकडे प्रयोगशाळा तंत्रज्ञ अचूक रक्ततपासण्यांद्वारे निदान प्रक्रियेत कणा म्हणून काम पाहतात. मात्र केवळ कामाची उद्दिष्टे आणि दैनंदिन अहवालांचा हिशेब मागितला जात असताना पगारवाढ, आरोग्य विमा आणि नोकरीच्या शाश्वतीकडे प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याची खंत कर्मचारी बोलून दाखवत आहेत.
विशेष म्हणजे बाधित रुग्ण शोधण्याचे ठरावीक उद्दिष्ट पूर्ण करण्याचा मोठा मानसिक दबाव समुपदेशकांवर टाकला जातो. प्रत्यक्षात तपासणीसाठी आलेली एखादी व्यक्ती बाधित ठरणे किंवा निरोगी असणे हे कर्मचार्यांच्या हातात नसते. त्यामुळे केवळ आकडेवारीचा खेळ मांडण्यापेक्षा नवीन संसर्ग रोखणे, वेळेवर निदान करणे आणि रुग्णांना योग्य उपचारांशी जोडणे याला प्राधान्य देणे गरजेचे आहे. कार्यक्रमाच्या यशाची जबाबदारी सर्व प्रशासकीय स्तरांवर समान असताना उद्दिष्टपूर्तीचा जाब केवळ कनिष्ठ कर्मचार्यांनाच विचारणे कितपत योग्य असा सवाल कर्मचार्यांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचार्यांच्या समायोजनासाठी राज्य शासनाने 14 मार्च 2024 रोजी दहा वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या कर्मचार्यांसाठी शासन निर्णय जारी केला होता. त्यात 4 नोव्हेंबर 2025 रोजी महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आली. त्यानंतर 30 जून 2026 रोजी घेण्यात आलेल्या निर्णयानुसार 25 जून 2026 पर्यंत तांत्रिक खंड वगळून दहा वर्षे सेवा पूर्ण केलेल्या 15,010 कर्मचार्यांसाठी समकक्ष वेतनश्रेणीतील अतिरिक्त पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली. यासाठी वार्षिक 1,153 कोटी 60 लाख रुपयांच्या खर्चालाही शासनाने मंजुरी दिली आहे. मात्र याच आरोग्य विभागाच्या अंतर्गत एड्स नियंत्रण कार्यक्रमात दीर्घकाळ सेवा देणार्या 1,800 कर्मचार्यांच्या समायोजनाचा प्रश्न अद्यापही अधांतरीच ठेवण्यात आला आहे.
केंद्र शासनाने 20 मार्च 2026 रोजी लोकसभेत दिलेल्या लेखी माहितीनुसार राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमातील कर्मचार्यांची नियुक्ती संबंधित राज्य एड्स नियंत्रण संस्थांकडून केली जाते. त्यांचा करार साधारणपणे एक वर्षाचा असतो आणि वेतनाचा आढावा पाच वर्षांच्या टप्प्याने घेतला जातो. त्यामुळे पगारवाढीसाठी कर्मचार्यांना पाच वर्षे वाट पाहावी लागते. या कर्मचार्यांना कायम करण्याचा विषय पूर्णपणे राज्य शासनाच्या अखत्यारीत असल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने राज्यातील या कर्मचार्यांचा प्रदीर्घ सेवा कालावधी, कामाचा अनुभव आणि शैक्षणिक पात्रता लक्षात घेऊन स्वतंत्र धोरण आखणे आता काळाची गरज बनली आहे.याशिवाय बाह्यस्रोत पद्धतीने म्हणजेच खासगी कंत्राटदारांमार्फत मनुष्यबळ नियुक्त करण्याच्या नव्या धोरणामुळेही कर्मचार्यांच्या पोटात गोळा आला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या 30 जून 2026 च्या शासन निर्णयात भविष्यातील नवीन भरती बाह्यस्रोत किंवा सेवा कराराद्वारे करण्याची तरतूद करण्यात आली आहे. अशा खासगी कंत्राटी नियुक्त्यांमध्ये दरमहा वेळेवर पगार, भविष्य निर्वाह निधी, आरोग्य विमा, उपदान आणि अपघाती विमा संरक्षणाची जबाबदारी नेमकी कोण घेणार असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
आरोग्य यंत्रणेचा कणा असलेल्यांच्या मागण्या
राज्य शासनाने एड्स नियंत्रण कार्यक्रमातील कर्मचार्यांची एकूण संख्या, सेवा कालावधी आणि वेतन याची माहिती तातडीने जाहीर करावी. दहा वर्षांहून अधिक सेवा पूर्ण केलेल्या पात्र कर्मचार्यांसाठी अनुभवाच्या आधारे समायोजनाचे स्वतंत्र धोरण आखावे. पाच वर्षांनी होणार्या पगार आढाव्यातील अनिश्चितता संपवून दरवर्षी नियमित पगारवाढ, भविष्य निर्वाह निधी, आरोग्य विमा आणि अपघाती संरक्षण प्रत्यक्ष लागू करावे.
दोन दशकांच्या निष्ठेचा सन्मान करावा
महाराष्ट्र राज्यातील एड्स नियंत्रण कार्यक्रमात समुपदेशक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ गेल्या वीस वर्षांहून अधिक काळ अत्यंत प्रामाणिकपणे सेवा देत आहेत. शासनाच्या आरोग्यविषयक उद्दिष्टपूर्तीसाठी अहोरात्र मेहनत घेणार्या या कर्मचार्यांना आजही नोकरीच्या स्थैर्याची आणि भविष्याची चिंता सतावत आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचार्यांप्रमाणेच एड्स प्रकल्पातील पात्र कर्मचार्यांचाही शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना सेवेची हमी द्यावी.
प्रमोद मिसाळ,
राज्य कृती समिती सदस्य, एड्स नियंत्रण कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य





