अमरावती कृषि उत्पन्न बाजार समितीच्या बरखास्तीची याचिका न्यायालयाने फेटाळली
संचालक मंडळाला मोठा न्यायालयीन दिलासा

प्रशासक नियुक्तीचा जिल्हा उपनिबंधकांचा आदेश ठरला बेकायदेशीर
अमरावती/26 नोव्हेंबर – अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्त करण्याचा जिल्हा उपनिबंधकांचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 25 नोव्हेंबर रोजी रद्द केला. संचालक मंडळाला आपली बाजू मांडण्याची योग्य संधी न देता केलेली कारवाई कायद्याच्या विरोधात असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
या निर्णयामुळे लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या संचालक मंडळाला मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती रजनीश व्यास यांच्या खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन समिती अधिनियमातील कलम 45 (1) नुसार बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करताना लेखी आदेशात ठोस कारणे देणे आवश्यक आहे. केवळ मागील घटनांचा उल्लेख करून संचालक मंडळाला जबाबदार धरणे योग्य नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. तसेच संचालकांनी कारणे दाखवा नोटिशीला दिलेल्या उत्तरातील आक्षेपांचा योग्य विचार झाला नसल्याचेही स्पष्ट केले. मंडळ बरखास्त करण्यापूर्वी राज्य पणन मंडळाचा सल्ला घेणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने सांगितले. या निकालानंतर बाजार समितीचे सभापती हरीश एकनाथराव मोरे यांनी समाधान व्यक्त केले. न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास होता. अखेर सत्याचा विजय झाला, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. न्यायालयीन लढाईमुळे बाजार समितीच्या विकासाचा महत्त्वाचा वेळ वाया गेल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. या लढ्यात साथ देणारे शेतकरी, संचालक मंडळाचे सहकारी, हितचिंतक आणि कायदेतज्ज्ञांचे त्यांनी आभार मानले. यापुढेही शेतकर्यांच्या हितासाठी आणि बाजार समितीच्या विकासासाठी काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
शेतकर्यांच्या हिताचा न्यायालयीन निर्णय
अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची बरखास्ती रद्द झाल्याने शेतकरी आणि संचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या मंडळावर कारवाई करताना कायदेशीर नियम पाळणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. या निर्णयामुळे बाजार समितीच्या कारभारात पुन्हा स्थिरता येण्याची अपेक्षा असून रखडलेली विकासकामे मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे.





