कुर्हाडीचे घाव घालून भावाने केली भावाची हत्या
संशयित ताब्यात : तरोडा येथील घटना

बाभुळगाव /26 नोव्हेंबर : कौटुंबिक वादातून लहान भावाने मोठ्यावर कुर्हाडीने घाव घालून त्यांची हत्या केली. ही घटना गुरूवारी सायंकाळी घडली. जगदीश राठोड (28, रा. तरोडा) असे मृताचे नाव आहे. दोघेही भाऊ शेजारीच राहत होते. त्यांचे कडाक्याचे भांडण झाल्याने लहान भाऊ प्रमोद राठोड याने थेट कुर्हाडीने वार केले. यात जगदीश गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती गावचे पोलिस पाटील यांनी बाभुळगाव पोलिसांना दिली. त्यानंतर ठाणेदार दिपमाल भेंडे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. गुन्ह्यातील संशयित म्हणून प्रमोद राठोड याला ताब्यात घेतले. वृत्तलिहिस्तोवर या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता. कुटुंबातीलच एकाचा जीव गेला तर दुसरा कारागृहात जाण्याच्या मार्गावर असल्याने राठोड कुटुंब पूर्णतः हादरले आहे. मृतक जगदीश राठोड याला दारूचे व्यसन होते. यामुळे तो घरी आला की वाद घालायचा, यातूनच सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान नेहमीप्रमाणे जगदीशने लहान भाऊ प्रमोद राठोड याच्याशी वाद घातला. नेहमीच्या वादाला कंटाळून प्रमोदने कुर्हाडीचे घाव घालून मोठ्या भावाला घराच्या अंगणातच संपविल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.





