इर्विनच्या आवारात सापडले मानवी अवयव
भटक्या कुत्र्यांनी तोंडात पकडून ओढले हातपाय, पोटाखालचा भाग बेपत्ता झाल्याने गूढ वाढले

अमरावती /26 नोव्हेंबर- जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारात गुरुवारी सकाळी ठिकठिकाणी मानवी शरीराचे तुकडे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. वॉर्ड क्रमांक 10 परिसरात भटके कुत्रे हातापायाचे लचके तोडून इकडे तिकडे पळताना दिसल्याने रुग्ण आणि नातेवाईकांची मोठी पळापळ झाली. मृताचे धड आणि हातपाय वेगवेगळ्या ठिकाणी सापडले असले तरी जांघेपासून पोटापर्यंतचा भाग अद्याप बेपत्ता असल्याने हा प्रकार नेमका घातपात की नैसर्गिक मृत्यू यावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. गुरुवारी सकाळी 9 च्या सुमारास वॉर्ड क्रमांक 10 समोर काही लोकांनाभटके कुत्रे मानवी पाय तोंडात धरून ओढत नेताना दिसले. सुरुवातीला हा प्रकार कोणाच्या लक्षात आला नाही. मात्र जवळ जाऊन पाहिल्यावर उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला. ही बातमी वार्यासारखी पसरताच नातेवाईक आणि कर्मचार्यांनी परिसरात शोधाशोध सुरू केली. वॉर्ड क्रमांक 10 आणि जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र इमारतीमधील चिंचोळ्या गल्लीतील नालीत हात आणि धड दिसून आले. या प्रकाराची माहिती मिळताच कोतवाली ठाणेदार रोशन सिरसाट आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि गुन्हे शाखेच्या पथकानेही आवाराची पाहणी करून पंचनामा केला. न्यायवैद्यक पथकाने घटनास्थळावरून महत्त्वाचे नमुने गोळा केले असून सर्व अवशेष शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. मृत व्यक्ती 50 ते 55 वर्षांची असून ती निराधार किंवा भिकारी असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मृताच्या एका हाताला लाल धागा बांधलेला असून त्याआधारे ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. शव 4 ते 5 दिवस जुने असल्याचा अंदाज आहे. रुग्णालयात चोवीस तास डॉक्टर आणि कर्मचार्यांची वर्दळ असताना इतके दिवस मृतदेह कोणाच्याही नजरेस कसा पडला नाही असा सवाल नागरिक विचारत आहेत. धोबी घाट ते अतिदक्षता विभाग इमारतीपर्यंत अवयव विखुरलेले असल्याने परिसरात मोठी दहशत पसरली आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच या घटनेमागील नेमके सत्य समोर येणार आहे
नवीन इमारत व नाल्यात अवयवांचा शोध
वॉर्ड क्रमांक 10 शेजारील धोबी घाटामागील नालीतून कुत्रा मानवी हात पळवताना दिसला. बांधकाम सुरू असलेल्या अतिदक्षता विभाग इमारतीजवळ दुसरा हात सापडला. जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालया समोरच्या नाल्यात पाय आढळला. चिंचोळ्या गल्लीतील नालीवर लोखंडी जाळी असतानाही आत अवयव कसे गेले याचा तपास पोलीस करत आहेत. यामुळे रुग्णालय प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेचे पूर्णपणे धिंडवडे निघाले आहेत.





