विकासाच्या नावाखाली वन्यजीवांच्या अधिवासावर घाला

वन्यजीवांचे स्थलांतर करण्याची मागणी

* वॉर संस्थेचा सापन नदी प्रकल्पाला विरोध

अमरावती /25 नोव्हेंबर– मेळघाटातील वन्यजीवांचा नैसर्गिक अधिवास, जैवविविधता आणि स्थानिक नागरिकांचे शेती व पाणीवापराचे हित धोक्यात येण्याची शक्यता लक्षात घेऊन सापन नदीवरील प्रस्तावित 1500 मेगावॅट जलविद्युत प्रकल्पाला विरोध सुरू झाला आहे. अचलपूर तालुक्यातील आडनदी आणि कामापूर परिसरात उभारण्यात येणार्‍या या प्रकल्पासाठी सुमारे 17 किलोमीटर लांबीची जलवाहिनी टाकण्याचे नियोजन असून, त्यामुळे संवेदनशील वनक्षेत्रावर विपरीत परिणाम होण्याची भीती वन्यजीव जागरूकता, संशोधन आणि बचाव कार्य करणार्‍या वॉर संस्थेने व्यक्त केली आहे. संस्थेने राज्यपालांना निवेदन पाठवून वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासाचे संरक्षण करण्यासाठी प्रस्तावित प्रकल्प अन्यत्र हलविण्याची मागणी केली आहे. वॉर संस्थेचे अध्यक्ष नीलेश कंचनपुरे यांनी निवेदनात राज्यघटनेतील अनुच्छेद 244 (1), पाचवी अनुसूची तसेच वनहक्क कायदा 1996 चा उल्लेख केला आहे. अनुसूचित क्षेत्रातील नैसर्गिक साधनसंपत्ती, जल, जंगल आणि जमिनीबाबत ग्रामसभेची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच राज्यघटनेतील अनुच्छेद 48-अ आणि 51-अ (ग) नुसार पर्यावरण, वन, नद्या आणि वन्यजीव संरक्षण ही राज्य व नागरिकांची जबाबदारी असल्याचे म्हटले आहे. प्रस्तावित जलवाहिनीमुळे वनक्षेत्रात बांधकाम वाढून पर्यावरणीय समतोल बिघडण्याची शक्यता आहे. स्थानिक शेती, पाणीपुरवठा आणि वन्यजीवांच्या हालचालींवर परिणाम होऊ शकतो. विकासकामांना विरोध नसून, मेळघाटातील जैवविविधता आणि नागरिकांचे हित जपून प्रकल्पाचे नियोजन करावे, अशी संस्थेची भूमिका आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972, भारतीय वन अधिनियम 1927 आणि वनसंरक्षण अधिनियम 1980 यांचा उल्लेख करत संस्थेने विकासकामांमुळे वन्यजीवांच्या अधिवासाला धोका निर्माण होऊ नये, अशी मागणी केली आहे.

वनसंवर्धनासाठी कायद्यांचा आधार

प्रस्तावित 1500 मेगावॅट जलविद्युत प्रकल्पामुळे मेळघाटातील संवेदनशील वनक्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता आहे. सुमारे 17 किलोमीटर लांबीच्या जलवाहिनीमुळे वनक्षेत्रात बांधकाम वाढू शकते. वन्यजीवांचा अधिवास, स्थानिक शेती, पाणीवापर आणि पर्यावरणीय समतोल जपण्यासाठी प्रकल्प अन्यत्र हलविण्याची मागणी वॉर संस्थेने राज्यपालांकडे केली आहे.

Back to top button