शाळांच्या मूल्यांकनासाठी मुदतवाढ, 46 शाळा अपूर्ण

तीन वेळा संधी देऊनही मूल्यांकन रखडले

शासकीय अनुदान रोखण्याची कारवाई होण्याची शक्यता

अमरावती/24 नोव्हेंबर– राज्यातील शाळांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी राबविण्यात येणारे स्वयंमूल्यांकन अद्याप पूर्ण न करणार्‍या 2,030 शाळांवर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील 46 शाळांचा समावेश असून, या शाळांना कारणे दाखवा नोटीस बजावून स्वयंमूल्यांकन पूर्ण न करण्याचे कारण विचारण्यात आले आहे. वारंवार मुदतवाढ देऊनही प्रक्रिया पूर्ण न केल्याने संबंधित शाळांचे शासकीय अनुदान रोखले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता, सुविधा आणि व्यवस्थापन सुधारण्यासाठी ‘शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा’ तयार करण्यात आला आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये प्रत्येक शाळेला या आराखड्यानुसार स्वयंमूल्यांकन पूर्ण करणे बंधनकारक होते. यासाठी सुरुवातीला 16 मार्च ते 15 एप्रिल 2026 अशी मुदत देण्यात आली होती. मात्र, शाळांच्या सोयीसाठी ही मुदत तीन वेळा वाढविण्यात आली. तरीही काही शाळांनी प्रक्रिया पूर्ण केली नाही. राज्यातील 1 लाख 5 हजार 996 शाळांनी स्वयंमूल्यांकन पूर्ण केले आहे. अमरावती जिल्ह्यात एकूण 2,839 शाळा असून, बहुतांश शाळांनी प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र, उर्वरित 46 शाळांकडून अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. शिक्षण संचालनालयाचे संचालक मंगेश जोशी यांनी जिल्ह्यातील शिक्षणाधिकार्‍यांना पत्र पाठवून संबंधित शाळांकडून तातडीने स्पष्टीकरण मागविण्याचे आणि अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. हा अहवाल राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार असून, समाधानकारक खुलासा न मिळाल्यास अनुदान रोखण्याची कारवाई होऊ शकते.

Back to top button