पंजाबमध्ये भाजप आणि अकाली दलाची युती
अमित शाह यांची दिल्लीत घोषणा

अकाली दलाचाच नेता मुख्यमंत्रीपदाचा चेहरा
नवी दिल्ली/24 नोव्हेंबर : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची तयारी आता वेगाने सुरू झाली आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या राज्यांमध्ये 2027 च्या सुरुवातीला निवडणुका होणार आहेत. या निवडणुका ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होतील. मात्र, निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची अधिकृत घोषणा उशिराने होण्याची शक्यता आहे. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता पंजाबमध्ये पुन्हा एकदा दोन जुने राजकीय मित्र पक्ष एकत्र आले आहेत. भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबिन आणि अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांच्यातील बैठकीनंतर पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी या दोन्ही पक्षांनी युती जाहीर केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, सहा वर्षांच्या दुराव्यानंतर हे दोन्ही पक्ष एकत्रित निवडणूक लढणार आहेत. याबाबतची घोषणा आज मंगळवारी(24 नोव्हेंबर) दोन्ही पक्षाच्या नेतेमंडळींनी पत्रकार परिषदेतून केली आहे.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नबिन आणि अकाली दलाचे प्रमुख सुखबीर बादल यांनी या युतीची घोषणा करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. यावेळी अमित शहांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत म्हटले की, अकाली दल आणि भाजप या पक्षाच्या दोन्ही प्रमुखांनी बसून हा निर्णय घेतलाय की पंजाब विधानसभा एकत्र लढणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदल्या दिवशी सुखबीर सिंग बादल यांच्याशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. अकाली दलाच्या पुनरागमनामुळे एनडीए पुन्हा पूर्ण झाली असल्याचे पंतप्रधानांनी म्हटल्याचेही त्यांनी सांगितले. अकाली दल हा आमचा जुना मित्रपक्ष आहे. आम्ही यापूर्वी एकत्र अनेक निवडणुका लढवल्या आहेत. त्यात कधी विजय मिळवला, तर कधी पराभवाचा सामना केला. आज हे नाते पुन्हा एकदा जोडले जात आहे, जुन्या मित्राचे स्वागत आहे. भाजप आणि अकाली दलाची युती ही हिंदू-शीख ऐक्याचे प्रतीक आहे. भाजप आणि अकाली दल निवडणुका लढताना पंजाबसाठी अनेक घोषणा करू, असे यावेळी शहांनी म्हटले.





