शहरात माकडाचा धुमाकूळ, नागरिक भयभित

सहा दिवसांपासून हल्ले सुरू; नगरसेवकाच्या पुढाकाराने वन विभागाची धाव

अमरावती/23 नोव्हेंबर – शहरातील प्रहारपुरा परिसरात गेल्या 5 ते 6 दिवसांपासून एका माकडाने नागरिकांवर हल्ले करून दहशत निर्माण केली होती. माकडाच्या हल्ल्यात अनेक लहान-मोठे नागरिक जखमी झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण होते. लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले होते. नागरिकांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत नगरसेवक बबलू शेखावत यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या सूचनेनंतर वन विभाग आणि महानगरपालिका प्रशासनाने संयुक्त कारवाई करीत माकडाला पकडण्यासाठी विशेष मोहीम राबविली.
प्रहारपुरा परिसरात गेल्या काही दिवसांपासून माकड अचानक नागरिकांवर झडप घालून त्यांना जखमी करीत होते. या सततच्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीती वाढली होती. मुलांना शाळेत पाठवताना, ज्येष्ठांना घराबाहेर पडताना तसेच रोजच्या कामासाठी ये-जा करताना नागरिकांना सावध राहावे लागत होते. माकडाच्या वाढत्या त्रासाबाबत नागरिकांनी नगरसेवक बबलू शेखावत यांच्याकडे तक्रार केली.नागरिकांची समस्या लक्षात घेऊन शेखावत यांनी वन विभाग आणि महानगरपालिकेच्या संबंधित अधिकार्‍यांना तातडीने माहिती दिली. त्यानंतर वन विभागाच्या पथकाने परिसरात शोधमोहीम राबविली. अखेर सुमारे 6 तासांच्या प्रयत्नांनंतर माकडाला पकडण्यात यश आले. वन विभागाच्या पथकाने माकडाला सुरक्षितरीत्या ताब्यात घेतल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. माकड पकडल्यामुळे परिसरातील नागरिकांनी नगरसेवक बबलू शेखावत यांच्या पुढाकाराचे कौतुक केले.

Back to top button