अमृत-2 योजना तातडीने पूर्ण करा
पाणीपुरवठा योजनेला गती देण्याचे आ. सुलभा खोडके यांचे निर्देश

जमीन हस्तांतरण, परवानग्यांचे प्रश्न तत्काळ निकाली काढण्यावर भर; अधिकार्यांसोबत आढावा
अमरावती /23 नोव्हेंबर- शहरातील वाढती लोकसंख्या, भविष्यातील पाण्याची गरज आणि उन्हाळ्यात जाणवणारी संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता, अमृत-2 अमरावती वृद्धिंगत पेयजल योजना तातडीने पूर्ण करण्यासाठी कामाला गती द्या, असे निर्देश आ. सुलभा खोडके यांनी अधिकार्यांना दिले. योजनेच्या कामात येणारे अडथळे दूर करून आवश्यक जमीन हस्तांतरण, परवानग्या आणि इतर प्रलंबित प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी केले. योजनेच्या कामाचा आढावा घेण्यासाठी 23 नोव्हेंबर रोजी संबंधित अधिकार्यांसोबत बैठक घेण्यात आली.
अमरावती शहरासाठी मंजूर 985.49 कोटी रुपयांच्या अमृत-2 पेयजल योजनेचे काम सुरू झाले असून, शहराला नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढते, तसेच भविष्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन योजनेची कामे नियोजनानुसार पूर्ण करण्याची गरज आ. खोडके यांनी व्यक्त केली. बैठकीत जमीन ताब्यात घेणे, परवानग्या, ना-हरकत प्रमाणपत्रे आणि विविध विभागांशी संबंधित प्रलंबित बाबींचा आढावा घेण्यात आला. या प्रक्रियेत दिरंगाई न करता समन्वयातून कामे मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. बैठकीला यश खोडके, माजी प्रभाग अधिकारी विवेक सोनळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी, प्रकल्प व्यवस्थापक राकेश जवाडे, उपअभियंता मनोज वाकेकर, तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पाणीपुरवठ्याच्या कामांना गती देण्याचे निर्देश
अमृत-2 योजनेतील प्रलंबित कामे, जमीन हस्तांतरण आणि परवानग्यांची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. शहराच्या भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन प्रकल्प पूर्णत्वाकडे नेण्यासाठी प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे, असे आ. सुलभा खोडके यांनी स्पष्ट केले.





