रस्तेयोग्य वाहनांनाच परवानगी देणे हा स्वयंचलित चाचणी केंद्राचा उद्देश

प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार

अकोला /20 नोव्हेंबर- मोटार वाहन कायद्यानुसार अकोला येथे स्वयंचलित चाचणी केंद्र (ऑटोमेटेड टेस्टिंग स्टेशन) 3 ऑगस्टपासून कार्यान्वित आहे. वाहनांची योग्यता वस्तुनिष्ठपणे तपासून केवळ पात्र वाहनांनाच रस्त्यावर चालविण्याची परवानगी देणे हा त्याचा हेतू आहे. वाहने रस्तेयोग्य असल्यास फेल होत नाहीत व पुन्हा चाचणीची गरज भासत नाही, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांनी स्पष्ट केले आहे.
ऑटोमेटेड टेस्टिंग स्टेशन येथे सुमारे 80 टक्के वाहन फेल होत असल्याचा दावा ती चुकीची माहिती आहे. वास्तविक, पात्र वाहनांना परवानगी देऊन वाहतूक सुरक्षित करणे हा केंद्राचा हेतू आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
या केंद्राचा मुख्य उद्देश वाहनांची योग्यता, सुरक्षा, ब्रेक चाचणी, प्रदूषण चाचणी, हेडलाइट, उत्सर्जन, सस्पेन्शन इतर निकषांची तपासणी करून केवळ कायद्यानुसार पात्र वाहनांनाच चालविण्याची परवानगी देणे हा आहे. चाचणी स्वयंचलित आणि कॅलिब्रेटेड उपकरणांद्वारे केली जाते. मानवी हस्तक्षेप किमान ठेवला जातो. त्यामुळे निकाल वस्तुनिष्ठ असून डिजिटल स्वरूपात वाहन किंवा एएफएमएस प्रणालीशी जोडला जातो. मानवी तपासणीतील व्यक्तिनिष्ठता दूर होते आणि रस्ते सुरक्षा व उत्सर्जन नियंत्रण या सरकारी धोरणांना बळकटी मिळते. हे केंद्र फक्त चाचणीसाठी असून, इतर व्यावसायिक व्यवहार करण्यास परवानगी नाही.
वाहन फेल होण्यामागील कारणे-वाहन फेल होण्याचे मुख्य कारण म्हणजे केंद्रीय मोटार वाहन नियम आणि मोटार वाहन कायद्यानुसार निर्धारित निकष पूर्ण न करणारी वाहने चाचणीसाठी सादर केली जातात. प्रदूषण चाचणी, ब्रेक चाचणीमध्ये निकष पूर्ण न होणे, हेडलाइटची चुकीची दिशा किंवा तीव्रता कमी होणे, अतिरिक्त उत्सर्जन, टायरची झीज, सस्पेन्शनमधील दोष आदी कारणांमुळे वाहने अपात्र ठरतात.हे निकष केंद्र शासनाने निश्चित केले व देशभर समान आहेत. त्यामुळे वाहनधारकांनी चाचणीपूर्वी आपली वाहने पूर्णतः रस्तेयोग्य करावीत जेणेकरून ती फेल होणार नाहीत. पुन्हा चाचणीची गरज भासणार नाही आणि अनावश्यक त्रास टळेल. स्वयंचलित चाचणी केंद्र हे राज्य शासनाने अधिकृत केलेली यंत्रणा आहे. त्याचे दैनंदिन कामकाज, व्यवस्था, उपकरणांचे संचालन आदी कामे अधिकृत खासगी यंत्रणेद्वारे केली जातात. सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी समीर शेख यांना स्वयंचलित चाचणी केंद्राच्या दैनंदिन प्रशासनाचे किंवा कामकाजाचे कोणतेही काम सोपविण्यात आले नाही. त्यांची या केंद्राच्या दैनंदिन कार्यपद्धतीत कोणतीही भूमिका नाही.

Back to top button