ट्राफिक पोलिसांची रस्त्यावर गाड्या अडवून खुलेआम लूट

शहर वाहतूक पोलिसांच्या उघड दरोडेखोरीविरोधात वाहन चालकाचा एल्गार

वाहन चालकांने हफ्ता नाकारताच सुडबुद्धीने ठोठावला दहा हजारांचा दंड

भ्रष्ट अधिकारी आणि मध्यस्थांच्या चौकशीची मागणी

कारवाई न झाल्यास सहकुटुंब आमरण उपोषणाचा इशारा

अमरावती/20 नोव्हेंबर– शहर वाहतूक पोलिसांच्या मुजोरपणाला, बेकायदा हफ्ता वसुलीला आणि गुंडगिरीला कंटाळून पिंपळगाव निपाणी येथील सर्वसामान्य वाहनचालक राहुल गोपाळराव वानखडे यांनी प्रशासनाविरोधात दंड थोपटले आहेत. रस्त्यावर गाड्या अडवून रोख किंवा भ्रमणध्वनीद्वारे पैसे उकळणार्‍या पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या खाजगी मध्यस्थांवर कडक कारवाई करावी. अन्यथा संपूर्ण परिवारासह शासकीय कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा खणखणीत इशारा त्यांनी जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
शहर आणि ग्रामीण भागातील वाहतूक पोलीस शाखेतील काही अधिकारी व कर्मचार्‍यांनी कायद्याचा धाक दाखवत सर्वसामान्य खाजगी वाहनचालकांची दररोज लूट चालवली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिंपळगाव निपाणी (ता. नांदगाव खंडेश्वर) येथील शेतकरी कुटुंबातील राहुल गोपाळराव वानखडे यांना कामानिमित्त दररोज खाजगी चारचाकी वाहनाने अमरावतीला ये-जा करावी लागते. या प्रवासादरम्यान भरगच्च रहदारीच्या रस्त्यावर वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी त्यांची गाडी अडवून दररोज पैशांची आणि हफ्ता लावण्याची मागणी करतात. यापूर्वी वाहतूक शाखेचे तत्कालीन कर्मचारीमनोज सुने हे बेकायदा हफ्ता वसुली करायचे. आता त्यांची बदली झाल्याने वाहतूक पोलीस निरीक्षक दिप्ती ब्राम्हणे, कर्मचारी प्रशांत मधुकर सरोदे आणि इतर कर्मचार्‍यांनी अरेरावी करत वसुलीचा सपाटा लावला आहे. हा काळा पैसा स्वतःच्या खिशात घालण्यासाठी त्यांनी खाजगी मध्यस्थ नेमले असून, त्यांच्याकडे रोख किंवा भ्रमणध्वनीद्वारे पैसे देण्यासाठी चालकांवर दबाव आणला जातो. या वसुलीबाबत जाब विचारला असता, आम्हाला वरूनच वसुलीचे आदेश असून जिथे तक्रार करायची तिथे करा, अशी मुजोर उत्तरे देत वरिष्ठ प्रशासनाचीही उघड बदनामी केली जात आहे. हफ्ता देण्यास नकार दिल्याने या कर्मचार्‍यांनी वानखडे यांना गलिच्छ भाषेत शिवीगाळ करत थेट जिवे मारण्याची धमकी दिली. इतकेच नव्हे तर 19 नोव्हेंबर 2026 रोजी केवळ सुडबुद्धीने त्यांच्या वाहनावर तब्बल 10,000 रुपयांचा संगणकीय दंड आकारला. हफ्ता न दिल्यास असेच दंड आकारून गाडी फिरवणे बंद करू, अशी गुंडगिरीची भाषा वापरत धमकी देण्यात आली. ग्रामीण भागातील महामार्गांवरही वाहतूक पोलिसांकडून अशाच प्रकारे सर्रास लूट सुरू आहे. या जाचाला कंटाळून माझ्या जीवाचे काही बरे-वाईट झाल्यास त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा देत वानखडे यांनी जिल्हाधिकारी, शहर पोलीस आयुक्त, ग्रामीण वाहतूक शाखा आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दिली आहे. या तक्रारीच्या प्रती मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, पोलीस महासंचालक, विभागीय आयुक्त तसेच अमरावती आणि वर्धा जिल्ह्यातील सर्व खासदार व आमदार यांना पाठवण्यात आल्या आहेत.

खोट्या ऑनलाइन चलानविरोधात प्रशासनाला उपोषणाचा इशारा
मी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील प्रामाणिक खाजगी वाहनमालक आहे. मात्र, अमरावती शहर आणि ग्रामीण वाहतूक पोलिसांच्या अवैध हप्ता वसुलीमुळे आमचे जगणे कठीण झाले आहे. खाजगी एजंटांच्या माध्यमातून फोनपे किंवा रोख रकमेची मागणी केली जाते आणि ’वरून आदेश आहेत’ असे सांगून वरिष्ठ प्रशासनाचीही बदनामी केली जाते. प्रवासी भरून वाहन चालवणे हा माझा व्यवसाय नसून मला पिंपळगाव निपाणी ते अमरावती दिवसातून फक्त एकदा जाणे आणि येणे असा प्रवास करावा लागतो. मी हप्ता देण्यास नकार दिल्याने मला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आणि सूडबुद्धीने तब्बल 10 हजार रुपयांचे खोटे ऑनलाइन चलान फाडण्यात आले. या भ्रष्ट अधिकारी व कर्मचार्‍यांच्या मालमत्तेची एसीबीमार्फत चौकशी होऊन हे खोटे चलान रद्द व्हावे. या तक्रारीची तात्काळ दखल न घेतल्यास मी माझ्या संपूर्ण परिवारासह शासकीय कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहे आणि माझ्या जीविताला कुठलाही धोका निर्माण झाला किंवा मी माझ्या जीवाचे काहीही केल्यास याला सर्वस्वी जबाबदार संबंधित प्रशासन राहील.
– राहुल गोपाळराव वानखडे (तक्रारदार)

Back to top button