सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण

विक्रीचा जोर वाढताच मौल्यवान धातूंचे भाव उतरले

आंतरराष्ट्रीय बाजारातील बदलाचा परिणाम

अमरावती /17 नोव्हेंबर– आंतरराष्ट्रीय बाजारातील विक्रीचा वाढता दबाव आणि गुंतवणूकदारांकडून सुरू असलेल्या नफावसुलीमुळे सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. वर्षाच्या सुरुवातीला विक्रमी उंची गाठणार्‍या या दोन्ही मौल्यवान धातूंचे भाव आता खाली आले असून, सोन्याचा दर 1,34,828 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर चांदीचा दर 1,69,194 रुपये प्रति किलोपर्यंत घसरला आहे. तज्ज्ञांच्या मते आगामी काळात पुन्हा दरवाढ होण्याची शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील बदलांचा परिणाम भारतीय सराफा बाजारावरही दिसून येत आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्ये 4 डिसेंबर 2026 रोजी मुदत संपणार्‍या सोन्याच्या व्यवहारात 1,34,385 रुपये प्रति 10 ग्रॅम हा नीचांकी, तर 1,72,400 रुपये हा उच्चांकी दर नोंदविण्यात आला. चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली असून, व्यवहारादरम्यान भाव 1,69,194 रुपये प्रति किलोपर्यंत खाली आले. यापूर्वी चांदीने 1,36,055 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली होती. तज्ज्ञांच्या मते, सोन्या-चांदीच्या दरातील घसरणीमागे गुंतवणूकदारांची विक्री आणि नफा मिळविण्यासाठी केलेले व्यवहार ही प्रमुख कारणे आहेत. त्रिमूर्ती ज्वेलर्सचे संचालक तसेच अखिल भारतीय रत्न व दागिने देशांतर्गत परिषदचे सदस्य अमित सोनी यांनी सांगितले की, सोन्याने विक्रमी पातळी गाठल्यानंतर दरात घसरण होणे स्वाभाविक आहे.

Back to top button