पुस्तकी ज्ञानासोबतच क्षमता विकसित करा

कुलसचिव डॉ.अविनाश असनारे यांचे प्रतिपादन, विद्यापीठात विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ

अमरावती /17 नोव्हेंबर : आजच्या स्पर्धेच्या युगात केवळ पदवी आणि पुस्तकी ज्ञानावर यश मिळणे कठीण आहे. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेऊन तांत्रिक कौशल्य आणि आत्मविश्वास वाढवावा. संकटावर मात करण्याची ताकद अंगी बाणवावी असे मोलाचे विचार संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अविनाश असनारे यांनी मांडले.
विद्यापीठातील संशोधन आणि नवोपक्रम संस्था तसेच हेक्साक्रोम या संस्थेच्या संयुक्त पुढाकाराने विद्यार्थ्यांसाठी दहा दिवसांचे खास प्रयोगशाळा प्रशिक्षण सुरू झाले आहे. या उपक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी नवोपक्रम केंद्राच्या प्रमुख प्रा. स्वाती शेरेकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद यादव उपस्थित होते. तसेच हिवरा आश्रम येथील विवेकानंद विज्ञान महाविद्यालयाचे रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. अमोल शेळके यांचीही प्रमुख उपस्थिती होती. या दहा दिवसांच्या काळात विद्यार्थ्यांना औषध निर्माण कारखान्यात वापरली जाणारी अत्याधुनिक यंत्रसामग्री हाताळायला मिळणार आहे. नमुने तपासणीच्या पद्धती आणि मालाचा दर्जा तपासण्याचे तंत्र त्यांना प्रत्यक्ष शिकवले जाईल. प्रयोगशाळेत काम करताना घ्यायची काळजी आणि कामाची प्रमाणित पद्धत याचेही धडे दिले जातील. महाविद्यालयातील पुस्तकी शिक्षण आणि कारखान्यातील प्रत्यक्ष काम यातील दरी या उपक्रमामुळे नक्कीच कमी होईल. खेड्यापाड्यातील आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या काळातच कारखान्यातील वातावरणाची ओळख व्हावी हा यामागचा मुख्य हेतू आहे. या सोहळ्याला विवेकानंद विज्ञान महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते. शिक्षण संस्था आणि उद्योग जगत यांच्या एकत्र येण्यामुळे उद्याचा कुशल कामगार वर्ग तयार होण्यास मोठी मदत होणार आहे

Back to top button