अमरावतीकरांनी अनुभवला पिळदार स्नायूंचा थरारक संगम

विदर्भस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेला रसिकांचा तुफान प्रतिसाद

आ. रवी राणांच्या उपस्थितीत रंगला सोहळा

अमरावती/16 नोव्हेंबर- युवा स्वाभिमान पक्षातर्फे आयोजित विदर्भस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत राज्यभरातील शरीरसौष्ठवपटूंनी आपला दमदार खेळ दाखवला. आ. रवी राणा यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि पवन दळवी, बबलू आठवले यांच्या पुढाकाराने सांस्कृतिक भवनात हा दिमाखदार सोहळा उत्साहात पार पडला.
शहरातील सांस्कृतिक भवनात काल सोमवारी पार पडलेल्या या स्पर्धेने क्रीडा रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. विदर्भस्तरीय स्तरावर भरवलेल्या या स्पर्धेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक नामांकित शरीरसौष्ठवपटूंनी हजेरी लावली होती. मंचावर उतरलेल्या प्रत्येक खेळाडूने आपली ताकद, लवचिकता आणि मेहनत दाखवून उपस्थितांची मने जिंकली. महाराष्ट्र विधानसभा आश्वासन समितीचे अध्यक्ष आ. रवी राणा यांनीया सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली. यावेळी बोलताना त्यांनी सर्व खेळाडूंच्या कष्टाचे तोंडभरून कौतुक केले. तरुणांनी व्यसनांपासून दूर राहून खेळाकडे वळावे आणि निरोगी आयुष्य जगावे, असा मोलाचा सल्ला देत त्यांनी सर्व स्पर्धकांना पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.पवन दळवी व बबलू आठवले यांनी या भव्य स्पर्धेचे नेटके नियोजन केले होते. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे सर्वत्र कौतुक झाले. या सोहळ्याला युवा स्वाभिमान पक्षाचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. टाळ्यांच्या कडकडाटात आणि तरुणाईच्या अफाट उत्साहात हा क्रीडा सोहळा रंगला.

Back to top button