डॉ. भोजने दाम्पत्याचे कार, मोबाईलसह दस्तावेज जप्त

नवजात बाळ विक्री प्रकरणात पोलिसांसमोर नवे आव्हान

प्रत्यक्ष तक्रारकर्ता नसल्याने अडचणीत वाढ

अमरावती /16 नोव्हेंबर– नवजात बालकाच्या 3.50 लाख रुपयांना विक्री केल्याच्या कथित प्रकरणात अटक करण्यात आलेल्या डॉ. वैशाली भोजने आणि प्रफुल्ल भोजने यांच्या असहकार्यामुळे पोलिसांचा तपास अडचणीत आला आहे. वारंवार चौकशी करूनही दाम्पत्याकडून आवश्यक माहिती मिळत नसल्याने अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. बालकाची विक्री नेमकी कोणाला करण्यात आली, संबंधित बालक सध्या कुठे आहे आणि रुग्णालयात झालेल्या प्रसूतींचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान, आज सोमवारी भोजने दाम्पत्याला पुन्हा न्यायालयात हजर करून आणखी 5 दिवसांची पोलीस कोठडी मागितली जाणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
या प्रकरणात पोलिसांनी भोजने दाम्पत्याची चारचाकी गाडी, दोघांचे मोबाईल आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. डॉ. भोजने यांच्या हस्ताक्षराची तपासणी अद्याप बाकी असून, जप्त केलेल्या कागदपत्रांवरील सह्यांचीही पडताळणी केली जाणार आहे. हस्ताक्षर तज्ज्ञांचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपी दाम्पत्याने सुरुवातीला 25 दिवस टाळाटाळ केली. त्यानंतर चौकशीतही सहकार्य केले नाही. त्यामुळे तपास पुढेनेण्यात अडथळे येत आहेत. डॉ. भोजने यांच्या मातृत्व रुग्णालयातील प्रसूतींच्या नोंदी तपासल्या जात आहेत. काही महिन्यांत 2 ते 4-5 प्रसूती झाल्याची माहिती समोर आली असून, त्या बालकांचा सध्याचा ठावठिकाणा शोधण्याचे काम सुरू आहे. यासाठी रुग्णालयाशी संबंधित कागदपत्रेही ताब्यात घेण्यात आली आहेत. या प्रकरणात बालकाची विक्री नेमकी कोणाला झाली, याचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. मात्र, अद्याप कोणताही तक्रारदार पुढे आलेला नाही. संबंधित प्रकरणाची माहिती किंवा तक्रार असलेल्या नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.तपासातील महत्त्वाचे मुद्दे-भोजने दाम्पत्याची गाडी, दोघांचे मोबाईल आणि कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहेत. डॉ. वैशाली भोजने यांच्या हस्ताक्षराची पडताळणी होणार आहे. रुग्णालयातील प्रसूतींच्या नोंदी तपासल्या जात असून, संबंधित बालकांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर कायम आहे.

Back to top button