बाभळीत कोल्ह्याची दहशत, सहा जणांना केले जखमी
वनविभागाकडून ड्रोनद्वारे शोधमोहीम

अमरावती /16 नोव्हेंबर– दर्यापूर तालुक्यातील बाभळी गावाजवळ कोल्ह्याने केलेल्या हल्ल्यात एका लहान मुलासह 2 महिला आणि 3 पुरुष असे एकूण 6 जण जखमी झाले आहेत. शनिवारी रात्रीपासून रविवार सकाळपर्यंत वेगवेगळ्या वेळी झालेल्या या हल्ल्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले. घटनेनंतर जंगलाच्या दिशेने पळालेल्या कोल्ह्याचा शोध घेण्यासाठी वनविभागाने पथक तैनात केले असून ड्रोनच्या मदतीने परिसराची तपासणी सुरू केली आहे. मात्र, अद्याप कोल्ह्याचा ठावठिकाणा लागलेला नाही.मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री कोल्ह्याने गावातील 3 जणांवर हल्ला करून त्यांना जखमी केले. त्यानंतर रविवारी सकाळी पुन्हा 3 जणांना लक्ष्य केले. यात एका लहान मुलाचा, 2 महिलांचा आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे गावकर्यांमध्ये घबराट पसरली असून नागरिकांकडून अधिक खबरदारी घेतली जात आहे. ही घटना दर्यापूर वनपरिक्षेत्रातील दर्यापूर-अंजनगाव वनपरिक्षेत्रांतर्गत घडली. माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जंगल आणि लगतच्या परिसरात कोल्ह्याचा शोध सुरू केला. ड्रोनच्या सहाय्याने झाडाझुडपांचा परिसर तपासण्यात आला; मात्र कोल्हा आढळून आला नाही. यापूर्वी धारणी आणि सुसर्दा परिसरात वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे बाभळीतील घटनेने नागरिकांची चिंता वाढली आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी संजीव इंगोले यांनी वनविभागाचे पथक कोल्ह्याचा शोध घेत असल्याची माहिती दिली. नागरिकांनी जंगल परिसरात एकटे जाणे टाळावे, असे आवाहनही करण्यात येत आहे.





