पालकमंत्र्यांची मायमाऊलींसोबत भाऊबीज साजरी

वनजमिनीचे हक्कपट्टे गोरगरीबांना मोफत देण्याचा निर्धार

कष्टकरी वडार समाजाला 700 ब्रास दगड विनाशुल्क
घरकुलांसाठी अडीच लाख रुपयांचे विशेष अनुदान
वडरपुरा वस्तीत महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती

अमरावती/12 नोव्हेंबर – राज्याचे महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वडरपुरा येथील कष्टकरी महिलांसमवेत भाऊबीज साजरी करत गोरगरीबांना हक्काच्या घराचे मोठे आश्वासन दिले. गेल्या 40 वर्षांपासून वन विभागाकडे नोंदलेल्या जमिनी महसूल विभागाकडे घेऊन संजय नगरातील नागरिकांना घर बांधणीसाठी मोफत देण्याचा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला. या निर्णयासाठी येत्या 27 तारखेला विशेष बैठक घेण्यात येणार असून वडार समाजाला विनाशुल्क दगड आणि घरकुलांसाठी अनुदान देण्याची घोषणाही त्यांनी केली.
राज्यात यंदा निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीचा सण गोरगरीब जनतेमध्ये जाऊन साजरा करावा, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानुसार नागपूर जिल्ह्याचा दौरा आटोपून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज अमरावती जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले होते. दुपारी अचलपूर तालुक्यातील आदिवासी बांधवांसोबत दिवाळीचा आनंद लुटल्यानंतर सायंकाळी ते अमरावती शहरातील वडरपुरा वस्तीत पोहोचले. यावेळी परिसरातील कष्टकरी महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून पालकमंत्र्यांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण केले.
उपस्थित महिलांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विकासाचा निर्धार बोलून दाखवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा सर्वांगीण विकास साधला जात असून अमरावती जिल्ह्याचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागत असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी आणि शेतमजूर हा विकासाचा केंद्रबिंदू मानून कष्टकरी वर्गाला भक्कम आधार दिला जाईल. वन विभागाच्या जमिनीच्या बदल्यात महसूल विभागाची जमीन देऊन समाज घटकांना हक्काचे मालकीपत्र दिले जाईल. या सोहळ्यात माजी खा. नवनीत राणा, आ. रवी राणा, आ. प्रवीण तायडे यांनी पालकमंत्र्यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले. प्रास्ताविक भाषणात आ. रवी राणा यांनी कष्टकरी महिलांसमवेत भाऊबीज साजरी केल्याबद्दल आभार मानून वस्तीतील स्थानिक अडचणी मांडल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते आगामी 2027 वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी फुलबाजी पेटवून दिवाळीचा उत्साह साजरा केला. भाऊबीज भेट म्हणून वस्तीतील कष्टकरी महिलांना माहेरची साडी आणि संसारोपयोगी किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे कष्टकरी महिलांच्या चेहर्‍यावर समाधानाचे हास्य फुलले होते.

कष्टकरी समाजाला विविध योजनांचा मोठा आधार
वडार समाजातील तरुणांना व्यवसायासाठी 700 ब्रासपर्यंत दगड आणि गोटा कोणतेही स्वामित्व शुल्क न आकारता मोफत दिला जाईल. यापूर्वी कुंभार समाजाला असाच लाभ दिला आहे. यासोबतच कष्टकर्‍यांना असंघटित कामगार ओळखपत्र आणि प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळवून दिला जाईल. घराच्या बांधकामासाठी अडीच लाख रुपयांचे अनुदान तसेच 20 वर्षे वीज देयक शून्य येण्यासाठी सौरऊर्जा घर योजनेतून समाजाला उन्नतीच्या वाटेवर नेले जाईल.

एक हजार रुपयांत घरांची नोंदणी व मालकीपत्र
1 जानेवारी 2011 पूर्वी ज्या नागरिकांनी जमिनीवर घरे बांधून वास्तव्य केले आहे, अशा सर्व रहिवाशांना जमिनीचे मालकीपत्र देण्याची योजना शासनाने आखली आहे. गोरगरीब नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसू नये म्हणून केवळ 1 हजार रुपयांच्या नाममात्र शुल्कात त्यांच्या घरांची अधिकृत नोंदणी करून दिली जाईल. यासाठी प्रशासनातर्फे वस्तीतच विशेष नोंदणी शिबिर आयोजित करण्याच्या स्पष्ट सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

Back to top button