आठ महिन्यांपासून पिंजर्‍यात डॉलीची प्रतीक्षा

निरोगी होऊनही जंगलात सोडण्याचा निर्णय रखडला

आईच्या हल्ल्यांचा इतिहास पुनर्वसनात अडथळा

परतवाडा /11 नोव्हेंबर– आईच्या हल्ल्यामुळे जंगलापासून दूर झालेली आणि गेल्या 8 महिन्यांपासून परतवाडा येथील वन्यजीव संगोपन केंद्रात देखरेखीखाली असलेली वाघीण डॉली हिच्या पुनर्वसनाचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. प्रकृतीत सुधारणा होऊनही तिला अद्याप पिंजर्‍यातून मुक्तता मिळालेली नाही. दररोज 8 ते 9 किलो बकर्‍याचे मांस, पाणी आणि आवश्यक उपचार मिळत असताना तिच्या नैसर्गिक अधिवासात परतण्याबाबत वनविभागाने अंतिम निर्णय घेतलेला नाही.
डॉ. चंद्रकांत धंदर हे दररोज जवळपास 12 तास तिची देखभाल आणि उपचार करीत आहेत. डॉलीने आतापर्यंत 2 वेळा माजाचा काळ अनुभवला असून, तिची प्रजनन क्षमता लक्षात घेता तिला योग्य जंगलात सोडण्याच्या शक्यतेवर विचार सुरू आहे. सुरक्षित वातावरणात तिचे पुनर्वसन झाल्यास भविष्यात वाघांच्या संवर्धनासाठीही तिचा उपयोग होऊ शकतो, अशी वन्यजीवप्रेमींची अपेक्षा आहे. मात्र, डॉलीला जंगलात सोडण्याचा निर्णय सोपा नाही. तिच्या आईने चंद्रपूर जिल्ह्यात 4 महिलांवर हल्ला करून त्यांचा बळी घेतला होता. या पार्श्वभूमीवर स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मेळघाटचे आमदार केवलराम काळे यांनी डॉलीला मेळघाट व्याघ्र प्रकल्पात सोडण्यास विरोध दर्शविला होता. त्यामुळे तिच्या पुनर्वसनाचा प्रश्न अधिक संवेदनशील बनला आहे. महाराष्ट्रात मेळघाट, पेंच, सह्याद्री आणि ताडोबा यांसारखे प्रमुख व्याघ्र प्रकल्प आहेत. यापैकी डॉलीसाठी कोणता अधिवास योग्य ठरेल, याचा वन्यजीव तज्ज्ञांच्या मदतीने अभ्यास करणे गरजेचे आहे. केवळ प्रकृती सुधारली म्हणून वाघिणीला जंगलात सोडणे योग्य ठरणार नाही. तिची शिकार करण्याची क्षमता, नैसर्गिक वातावरणात जगण्याची तयारी, माणसांशी संघर्ष होण्याची शक्यता आणि संबंधित जंगलातील परिस्थिती तपासावी लागणार आहे. दरम्यान, डॉलीच्या पुनर्वसनाबाबत अमरावती येथील मुख्य वनसंरक्षक कार्यालयाला पत्र पाठविण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. वन्यजीवप्रेमींनी तिच्या भवितव्याबाबत स्पष्ट भूमिका घेण्याची मागणी केली आहे. डॉ. चंद्रकांत धंदर यांच्याशी झालेल्या चर्चेतही तिची सध्याची प्रकृती, देखभाल आणि जंगलात सोडण्याच्या शक्यतांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आठ महिन्यांपासून पिंजर्‍यात असलेल्या डॉलीला जंगलातील मोकळे जीवन कधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Back to top button