पर्यावरणीय आव्हानांवर आयआयटी शोधणार उपाय

35 हजार डॉलरचे बक्षीस; IIT मुंबईची जागतिक स्पर्धेची घोषणा

मुंबई/11 नोव्हेंबर – हवामान बदल, ऊर्जा संकट आणि अन्न-पाणी सुरक्षेची आव्हाने दिवसेंदिवस गंभीर होत असताना, त्यावर नावीन्यपूर्ण उपाय शोधण्यासाठी आयआयटी मुंबईने पुढाकार घेतला आहे. जगभरातील विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला चालना देणार्‍या ‘ग्लोबल सस्टेनेबिलिटी चॅलेंज’ (जीएससी) या जागतिक स्पर्धेच्या माध्यमातून पर्यावरण आणि शाश्वततेशी संबंधित समस्यांवर उपाय शोधले जाणार आहेत. या स्पर्धेत 35 हजार अमेरिकी डॉलरहून अधिक बक्षीस रक्कम ठेवण्यात आली असून, विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर आपले संशोधन आणि संकल्पना सादर करण्याची संधी मिळणार आहे. जगातील नामांकित शैक्षणिक संस्थांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येणार्‍या या स्पर्धेत 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी दोन प्रमुख विषय निश्चित करण्यात आले आहेत. ‘शाश्वत ऊर्जा’ आणि ‘अनुकूलन व लवचिकता’ या विषयांवर विद्यार्थ्यांना प्रकल्प विकसित करावे लागणार आहेत. स्वच्छ ऊर्जानिर्मिती, ऊर्जा साठवणूक, वितरण आणि कार्यक्षमता यांसह हवामान बदलाच्या परिणामांना तोंड देण्यासाठी पाणी सुरक्षा, अन्नसुरक्षा आणि उष्णतेच्या लाटांपासून संरक्षण यावर भर दिला जाणार आहे.

Back to top button