दिवाळीच्या रात्री निक्कू कचरेची निर्घृण हत्या

जुन्या वादातून चौघांनी केले चाकूने सपासप वार

तीन आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात, मुख्य आरोपी राजू काळे फरार

अमरावती /9 नोव्हेंबर- दिवाळीच्या रात्री शहरात पुन्हा एकदा रक्तरंजित घटना घडली. गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महेंद्र कॉलनी परिसरात जुन्या वादाचा राग मनात धरून चौघांनी मिळून निक्कू ऊर्फ चैतन्य कचरे या तरुणाची चाकूने वार करून हत्या केली. घरात झोपलेल्या निखिलला रात्री 10 वाजताच्या सुमारास दारू पिण्याच्या बहाण्याने बाहेर बोलावण्यात आले. त्यानंतर चंदू जवंजाळ यांच्या रेतीच्या ठिय्याजवळ टाईटम जिमसमोर त्याच्यावर हल्ला करण्यात आला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून गाडगेनगर पोलीस आणि गुन्हे शाखेने तातडीने कारवाई करत 3 आरोपींना ताब्यात घेतले. मात्र, मुख्य आरोपी राजू काळे अद्याप फरार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निक्कू ऊर्फ चैतन्य कचरे हा घटनेच्या रात्री घरी झोपलेला होता. यावेळी राजू काळे याने त्याला दूरध्वनी करून दारू पिण्यासाठी बाहेर बोलावले. निखिल आपल्या चारचाकी वाहनाने बाहेर गेला. चंदू जवंजाळ यांच्या रेतीच्या ठिय्याजवळ टाईटम जिमसमोर राजू काळे, विशाल यादव, गुल्या ऊर्फ अश्विन पहाडन आणि भूषण टाले यांनी त्याला गाठले. चौघांनी मिळून त्याच्या गळ्यावर चाकूने वार केले. गंभीर जखमी अवस्थेत निखिलला सोडून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. गुल्या आणि भूषण टाले हे वाहनावरून पळून गेल्याची माहिती आहे. हल्ल्यानंतर स्थानिक नागरिक आणि नातेवाइकांनी निखिलला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी निखिलचे वडील राजेंद्र तुळसीराम कचरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. जुन्या वादातून सूड घेण्याच्या उद्देशाने ही हत्या करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, निखिल कचरे याच्यावर गाडगेनगर पोलीस ठाण्यात यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल होते. सुमारे 6 ते 7 वर्षांपूर्वी त्याने राजू काळे याच्यावर चाकूने हल्ला केला होता. त्या प्रकरणात निखिलला अटकही झाली होती. याच जुन्या वादाचा राग मनात ठेवून राजू काळे आणि त्याच्या साथीदारांनी त्याची हत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली. गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने गुन्हे शाखेच्या मदतीने शोधमोहीम राबवून विशाल यादव, गुल्या ऊर्फ अश्विन पहाडन आणि भूषण टाले या तिघांना ताब्यात घेतले. मुख्य आरोपी राजू काळे याचा शोध सुरू आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 (1) आणि 3 (5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक जावेद अहमद पुढील तपास करीत आहेत. आरोपींना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी मिळविण्याची तयारी सुरू होती.
Back to top button