गोकुळमध्ये महायुतीचा अध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा?
अध्यादेशास स्थगितीची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली

आजच्या निवडणुकीकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष्य
संचालकांचे मतदान वेगळ्या पेटीत नोंदविण्याचे आदेश
चार तास हाय-व्होल्टेज सुनावणी
औरंगाबाद/9 नोव्हेंबर ः गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत पुन्हा मोठा सस्पेन्स निर्माण झाला आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात तब्बल चार तास हाय व्होल्टेज सुनावणी पार पडली. यानंतर कोर्टाने महत्त्वाच्या अटी ठेवत निवडणुकीला मान्यता दिली आहे. पण या अटींमुळे गोकुळच्या अध्यक्षपदाबाबत मोठा सस्पेन्स निर्माण झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून पेटलेला राजकीय वाद आता थेट न्यायालयाच्या पायर्यांपर्यंत पोहोचला असून, सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात यावर तब्बल चार तास हाय-व्होल्टेज सुनावणी पार पडली. राज्य शासनाने नियुक्त केलेल्या चार संचालकांच्या निर्णयाला आणि अध्यादेशाला स्थगिती देण्याची विरोधकांची याचिका सुटीकालीन न्यायाधीश नीरज धोटे यांनी फेटाळून लावली आहे. त्यामुळे मंगळवारी गोकुळच्या अध्यक्षपदाची निवडणूक ठरल्यानुसारच होणार असली, तरी न्यायालयाने या प्रक्रियेत मोठे ट्विस्ट आणले आहेत!
औरंगाबाद खंडपीठाने सुनावणीअंती महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. न्यायालयाने स्पष्ट केले की, मंगळवारची अध्यक्षपदाची निवडणूक सुरळीत पार पडेल. शासनाने नियुक्त केलेले चारही संचालक या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावतील; परंतु त्यांचे मतदान हे ’वेगळ्या पेटीत’ घेतले जाईल! तसेच संपूर्ण मतदान प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. निवडणुकीचा निकाल जरी जाहीर झाला, तरी ही संपूर्ण प्रक्रिया आणि अंतिम निकाल हा न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीनच राहील, असे आदेश देत न्यायालयाने पुढील सुनावणी 25 नोव्हेंबर रोजी निश्चित केली आहे.
ज्येष्ठ कायदेतज्ज्ञांची न्यायालयात जोरदार चकमक
या हाय-प्रोफाइल प्रकरणात दोन्ही बाजूंकडून देशातील नामांकित कायदेतज्ज्ञांनी किल्ला लढवला. याचिकाकर्ते शशिकांत पाटील चुवेकर यांच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ डॉ. अभिषेक मनू सिंघवी आणि ड. आशुतोष कुंभकोणी यांनी बाजू मांडताना, शासनाची ही चार संचालकांची नियुक्ती पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचा दावा केला. तर दुसरीकडे, राज्य सरकारच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांनी विविध कायदेशीर संदर्भ देत, कोरम पूर्ण करण्यासाठी शासनाने केलेले हे पाऊल पूर्णपणे कायदेशीरच असल्याचा घणाघाती युक्तिवाद केला.
शिंदेसेनेच्या अजित नरकेंचे नाव चर्चेत
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक उद्या होत असून या निवडणुकीत गोकुळचा नवा अध्यक्ष निवडला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर गोकुळवर महायुतीचा आणि त्यातही शिंदे यांच्या शिवसेनेचा पहिला अध्यक्ष करण्यावर एकमत झाल्याची माहिती समोर येत आहे. आमदार चंद्रदीप नरके यांचे बंधू अजित नरके यांच्या नावाची जोरदार चर्चा असून, आणखी एका नावाचीही चर्चा सुरू आहे. मात्र, दुसर्या उमेदवाराचे नाव अद्याप गुलदस्त्यात असून अधिकृत घोषणा उद्या महायुतीचे नेते बैठक घेऊन करणार आहेत.





