विहिरीची मोटार काढण्यावरून मारहाणीत मृत्यू
मदतीला नकार देताच वाद चिघळला

अमोल गुजरविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल
अमरावती/9 नोव्हेंबर – विहिरीतील बंद पडलेली मोटार बाहेर काढण्यासाठी मदत करण्यास नकार दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून दीपक मुरकुटे यांना बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या मुरकुटे यांचा उपचारादरम्यान 8 नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला. 2 नोव्हेंबर रोजी खोडगाव अलिपूर येथील शंकर मंदिराजवळ ही घटना घडली होती. या प्रकरणी रुक्मिणी नगर अंजनगाव सुर्जी येथील अमोल शंकर गुजर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यासाठी पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल गुजर याने दीपक मुरकुटे यांचे शेत शेतीच्या कामासाठी घेतले होते. दरम्यान, शेतातील विहिरीची पाणी उपसण्याची मोटार बंद पडली. ही मोटार विहिरीतून बाहेर काढण्यासाठी अमोल गुजर याने मुरकुटे यांची मदत मागितली. मात्र, दीपक यांनी मदत करण्यास नकार दिला. याच कारणावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. संतापलेल्या अमोल गुजर याने दीपक मुरकुटे यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यांच्या चेहर्यावरही ठोसे मारण्यात आले. या हल्ल्यात दीपक गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने अचलपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने अखेर 8 नोव्हेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. दीपक यांचे पुत्र ओम मुरकुटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी 8 नोव्हेंबर रोजी अमोल शंकर गुजर याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला. आरोपीला अटक करण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत. दिवाळीच्या काळात जिल्ह्यात खुनाच्या 2 घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.





