प्रसुतीनंतर महिलेचा मृत्यू, नातेवाईकांचा गोंधळ
रुग्णालयावर हलगर्जीपणा केेल्याचा आरोप

डॉक्टरांवर कठोर कारवाईची मागणी
अमरावती/6 नोव्हेंबर – सामान्य प्रसूतीनंतर अवघ्या 4 तासांत 32 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याच्या धक्का दायक घटनेने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. माधवी वैभव नवघरे असे मृत महिलेचे नाव असून, गुरुवारी सकाळी 10.18 वाजता त्यांनी एका निरोगी बाळाला जन्म दिला होता. मात्र, बाळाच्या जन्मानंतर काही तासांतच त्यांची प्रकृती खालावली आणि दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. प्रसूतीनंतर महिलेची प्रकृती बिघडत असताना डॉक्टरांनी वेळीच योग्य उपचार केले नाहीत, असा गंभीर आरोप नातेवाइकांनी केला आहे. संबंधित डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासनावर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्यानंतर माधवी यांना परतवाडा येथील डॉ. श्रीकांत धुमाळे यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी सकाळी 10.18 वाजता त्यांची सामान्य प्रसूती झाली. त्यांनी निरोगी बाळाला जन्म दिल्यानंतर आई आणि बाळाला सामान्य कक्षात हलविण्यात आले. मात्र, काही वेळातच माधवी यांची प्रकृती खालावू लागली. अशा परिस्थितीत तातडीने तपासणी करून आवश्यक उपचार करणे गरजेचे होते. मात्र, रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचार्यांनी वेळीच गांभीर्य दाखविले नाही, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान माधवी यांचा श्वास थांबला. रुग्णालयाच्या नोंदीत ऑक्सिजन आणि श्वसनाशी संबंधित समस्या मृत्यूचे कारण नमूद असल्याची माहिती आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल आणि वैद्यकीय तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे. या घटनेनंतर संतप्त नातेवाइकांनी रुग्णालयात नाराजी व्यक्त केली. उपचारादरम्यान रुग्णाच्या नातेवाइकांकडून खाण्यापिण्याच्या वस्तू मागविण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. माधवी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, डॉ. श्रीकांत धुमाळे आणि रुग्णालय प्रशासनाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.
चार तासांत आनंदाचे दुःखात रूपांतर -सकाळी 10.18 वाजता नवजात बाळाच्या आगमनाने नवघरे कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. मात्र, दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास माधवी यांच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. प्रसूतीनंतर तातडीचे उपचार का मिळाले नाहीत, याची चौकशी करून सत्य समोर आणण्याची मागणी नातेवाइकांनी केली आहे. शवविच्छेदन अहवाल आणि पोलिस तपासाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.





