युवा सेना महानगरप्रमुख रोहित धोटे यांचा राजीनामा
अमरावतीत शिंदे गटाला झटका

अमरावती / 1 जुलै: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना प्रणित युवा सेनेचे अमरावती महानगर प्रमुख रोहित धोटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे अमरावती शहरात शिंदे गटाला मोठा झटका बसला आहे. वरिष्ठ नेते अभद्र वागणूक देत असल्याचा आरोप करुन आपण राजीनामा देत असल्याचे रोहित धोटे यांनी आज एका पत्रकार परिषदेत जाहिर केले. पदाचे आमिश दाखवून आणि मोठाल्या गप्प हाकून आपला शिंदे यांच्या शिव सेनेत प्रवेश करवून घेण्यात आला होता. मात्र जेव्हा लोकांशी संबं धित काम घेउन आपण पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे गेलो, तेव्हा आपल्याला अभद्र वागणूक देण्यात आल्याचा आरोप रोहित धोटे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला. त्यामुळे आपण व आपले समर्थक कार्यकर्ते पक्षाप्रती नाराज असून सर्वांनी पदाचा राजीनाम देत पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचे धोटे यांनी सांगितले. आपण कट्टर शिवसैनिक असून सुरुवातीपासून उद्धव ठाकरे यांचे समर्थक आहोत. कालही आपण ठाकरे यांच्यासोबत होतो, आजही आहे आणि उद्याही राहु असे धोटे म्हणाले. आपली पून्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षात घरवापसी होणार असून लवकरच प्रवेशाची पक्रिया पूर्ण करणार असल्याचे रोहित धोटे यांनी स्पष्ट केले. रोहित धोटे यांनी आपले काका माजी नगरसेवक व जूने शिवसैनिक स्व. रविंद्र धोटे यांच्या मार्गदर्शनात अमरावती शहरात शिवसेनेच्या कामाला सुरुवात केली होती. गरजवंतांच्या मदतीला तत्पर असलेला युवा शिवसैनिक म्हणून त्यांनी शहरात आपली ओळख निर्माण केली आहे. त्यांच्यामार्ग युवकांची मोठी फळी उभी आहे.




