कलाम यांना न्याय मिळवून देण्यासाठी कँडल मार्च

शेकडो नागरिकांचा सहभाग

अमरावती / 1 जुलै: वलगाव पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक अब्दुल कलाम यांची शनिवारी नवसारी परिसरात निर्घुनपणे हत्या करण्यात आली. सुस्वभावी व सर्वांच्या मदतीसाठी धावून जाणारा तत्पर पोलिस अधिकारी म्हणून ओळख असलेल्या एएसआय अब्दुल कलाम यांना न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी आज मंगळवारी सायंकाळी नागपुरी गेट परिसरात कँडल मार्च काढण्यात आला. त्यात गणमान्य व्यक्तींसोबतच शेकडो नागरिक सहभागी झाले होते. हातात जळत्या मेणबत्त्या घेउन ही मार्च काढण्यात आला. नागपूरी गेट चौकात मेणबत्त्या जाळून दिवंगत अब्दुल कलाम यांच्यासाठी सर्वांनी प्रार्थना केली. शनिवारी सायंकाळी वलगाव पोलिस ठाण्यात आपल्या कर्तव्यावर दुचाकीने जात असताना अब्दुल कलाम यांच्यावर कारमधून आलेल्या मारेकर्‍यांनी हल्ला चढविला होता. आधी त्यांच्या दुचाकीला धडक देवून त्यांना खाली पाडण्यात आले. नंतर त्यांच्या अंगावर कार चढविण्यात आली. नंतर अर्धमेल्या अवस्थेत जमीनीवर पडलेल्या कलाम यांच्यावर चाकूने तब्बल 15 वार करण्यात आले. त्यात कलाम यांचा मृत्यु झाला होता. एका कर्तव्यतत्पर अधिकार्‍याची अशा अमानवीय पद्धतीने हत्या करण्यात आल्याने शहरातील समाजमन हेलावून गेले असून कलाम यांच्या हत्येबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे. कलाम यांच्यासाठी प्रार्थना करतानाच आज कँडल मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी त्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली. एएसआय अब्दुल कलाम यांच्या हत्या प्रकरणात तीन आरोपींना गाडगेनगर पोलिसांनी अटक केली आहे. आणखी काही आरोपी फरार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यांना तात्काळ अटक करुन आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी याकरिता पोलिसांनी प्रयत्न करावे, अशी मागणीही उपस्थितांकडून करण्यात आली.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button