दादासाहेब गवई यांच्या स्मृतींना अभिवादन

खा.बळवंत वानखडे, माजी सरन्यायाधीश भूषण गवई आणि कमलताई गवई यांचीही उपस्थिती

अमरावती /30 ऑक्टोबर- ज्येष्ठ समाजसेवक, शिक्षणतज्ज्ञ आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल स्व. रा.सु. ऊर्फ दादासाहेब गवई यांच्या जयंतीनिमित्त दर्यापूर तालुक्यातील दारापूर येथील त्यांच्या समाधीस्थळी विविध मान्यवरांनी उपस्थित राहून अभिवादन केले. खासदार बळवंत वानखडे यांनी समाधीस्थळी पुष्प अर्पण करून दादासाहेब गवई यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले.
यावेळी देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई, माजी लेडी गव्हर्नर प्रा. डॉ. कमलताई गवई यांच्यासह गवई कुटुंबातील सदस्य आणि परिसरातील अनेक मान्यवर नागरिक उपस्थित होते.(दादासाहेब गवई यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात केलेले काम आजही समाजासाठी मार्गदर्शक ठरत आहे. समाजातील वंचित आणि दुर्बल घटकांना न्याय मिळावा, त्यांना शिक्षणाच्या आणि प्रगतीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. त्यांच्या कार्यामुळे अनेकांना नवी दिशा मिळाली असून समाजातील विविध घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहणारे आहे. यावेळी खा. बळवंत वानखडे यांनी दादासाहेब गवई यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी उभे केलेले सामाजिक कार्य आणि समाजासाठी दिलेले योगदान नव्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी उपस्थितांनीही समाधीस्थळी अभिवादन करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

Back to top button