आमदार कार्यालयात चोरी; कागदपत्रांसह यंत्रणा लंपास

जनतेची निवेदने पळवून पुरावे नष्ट करण्याचा डाव

नासधूस करत नोंदणी पेटी गायब

दर्यापूर/30 ऑक्टोबर – येथील शिवसेना उबाठा गटाचे स्थानिक आमदार गजानन लवटे यांच्या जनसंपर्क कार्यालयावर चोरट्यांनी अचानक डल्ला मारून महत्त्वाची शासकीय कागदपत्रे, नागरिकांची विविध निवेदने आणि देखरेख यंत्रणेची नोंदणी पेटी पळवून नेली. या प्रकारामुळे शहरात जोरदार चर्चा सुरू असून चोरीमागे केवळ माल लांबवणे हा हेतू नसून महत्त्वाची माहिती दडपणे किंवा पुरावे नष्ट करण्याचा कट असावा असा संशय बळावला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून शोध मोहीम सुरू केली आहे.
शहरातील मुख्य भागात असलेल्या आमदार कार्यालयात रात्रीच्या वेळी ही मोठी चोरी घडली. कार्यालयाचे कुलूप तोडून आत शिरलेल्या अज्ञात चोरट्यांनी सर्व कपाटांची उचकापाचूक केली. जनतेच्या कामासाठी जमा करून ठेवलेली निवेदने, शेतकरी बांधवांचे अर्ज आणि विकासकामांशी जोडलेली कागदपत्रे चोरट्यांनी थेट पळवून नेली. आमदार कार्यालय हे गावखेड्यातील सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी आणि नागरिकांच्या तक्रारी मांडण्याचे हक्काचे ठिकाण मानले जाते. दररोज परिसरातील नागरिक पाणी, वीज, रस्ते, आरोग्य आणि शेतीविषयक अडचणी घेऊन या ठिकाणी निवेदने देतात. लोकांच्या हक्काची ही सर्व महत्त्वाची निवेदनेच कार्यालयातून अचानक गायब झाल्यामुळे परिसरातील नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.चोरट्यांनी केवळ कागदपत्रांवर हात मारला नाही, तर कार्यालयातील सुरक्षा यंत्रणेची तोडफोड केली. आत लावलेल्या कॅमेर्‍यांचे चित्रण ज्या नोंदणी पेटीत साठवले जाते, ती संपूर्ण नोंदणी पेटीच चोरट्यांनी लंपास केली. त्यामुळे चोरट्यांचा माग काढणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरत आहे. चोरीच्या उद्देशावरून आता अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
घटनेची माहिती मिळताच दर्यापूर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. हा प्रकार निव्वळ चोरीचा आहे की यामागे काही राजकीय कटकारस्थान दडले आहे, याचा तपास पोलीस बारकाईने करत आहेत. लोकप्रतिनिधींच्या कार्यालयातच अशी घटना घडल्याने दर्यापूर शहरात भीतीचे आणि संशयाचे वातावरण पसरले आहे.

Back to top button