फटाक्यांवर पूर्ण बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
विराट कोहलीसारख्या सेलिब्रिटींची मदत घेण्याचा सल्ला

मुंबई /29 ऑक्टोबर : दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली-एनसीआर मध्ये फटाक्यांवर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी करणार्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठी टिप्पणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, न्यायालय फटाक्यांवर पूर्ण बंदी घालण्याच्या बाजूने नाही, तर याप्रकरणी एक संतुलित आदेश पारित केला जाईल.
सणांच्या काळात लोकांच्या उत्साहावर किंवा आनंदावर गदा आणण्याची न्यायालयाची मुळीच इच्छा नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने फटाक्यांचे नियम मोडणार्यांवर आणि अवैध विक्री करणार्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
फटाके आणि प्रदूषणाबाबत लोकांमध्ये जागरूकता पसरवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एक अनोखा सल्ला दिला आहे. नवीन पिढी आधीपासूनच फटाके आणि प्रदूषणाबाबत बर्यापैकी जागरूक आहे. मात्र, फटाक्यांमुळे होणार्या प्रदूषणाविषयी जनजागृती करण्यासाठी विराट कोहलीसारख्या लोकप्रिय सेलिब्रिटींचा वापर केला गेला पाहिजे, अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी न्यायालयाने केली आहे.
दरवर्षी या विषयावर आदेश जारी करावे लागण्यावर भाष्य करताना न्यायालयाने म्हटले की, हा विषय आता न्यायालयासाठी केवळ एक शैक्षणिक मुद्दा बनला आहे. न्यायालयाच्याआदेशांचे पालन कमी आणि उल्लंघनच जास्त होते, असे न्यायाधीशांनी मान्य केले. केवळ बंदी घालून या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघू शकत नाही, त्यामुळे केवळ कागदी आदेशांपेक्षा कठोर अंमलबजावणी आवश्यक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले





