शेतकरी मदतीसह दहा मागण्यांसाठी रवी राणांचे साकडे

बेलोरा विमानतळावर रात्रीच्या विमान सेवा सुरु करा

अमरावती /27 ऑक्टोबर – जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता शेतकरी आणि शेतमजुरांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत द्यावी, रोजगाराची कामे सुरू करावीत, बेलोरा विमानतळावर रात्री विमान उतरवण्याची सुविधा उपलब्ध करावी, चिखलदरा येथील पादचारी मार्गाचे काम पूर्ण करावे, तसेच धारणीसह मेळघाटातील आरोग्य आणि वीजसेवा सुधारावी, अशा दहा मागण्या आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केल्या आहेत.
जिल्ह्यातील शेतकरी आणि शेतमजुरांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने पात्र लाभार्थ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी रवी राणा यांनी केली आहे. ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून जलसंधारण, तलाव आणि नाल्यांमधील गाळ काढणे, तसेच मृदसंधारणाची कामे सुरू करण्यावर त्यांनी भर दिला आहे. बेलोरा विमानतळावर रात्रीच्या वेळी विमान उतरवण्याची सुविधा विकसित करावी आणि वैमानिक प्रशिक्षण शाळा सुरू करावी, अशी मागणीही पत्रात करण्यात आली आहे. चिखलदरा येथील पादचारी मार्गाचे काम पूर्ण करून तो पर्यटकांसाठी खुला करण्याची सूचना त्यांनी केली आहे. भातकुली आणि दर्यापूर तालुक्यांतील खारपाणपट्ट्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी स्वतंत्र विकास धोरण आखण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. रतन इंडिया पॉवर प्रकल्पाच्या पाणीवापराचा आढावा घेण्याबरोबरच भारत डायनॅमिक्स लिमिटेडशी संबंधित जमिनींची मालकी, भूसंपादनाच्या अटी आणि कायदेशीर तरतुदी तपासण्याची मागणीही करण्यात आली आहे. प्रत्येक तहसीलमध्ये 100 खाटांची रुग्णालये उभारावीत, तर मेळघाटात डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता वाढवावी. दुर्गम आदिवासी भागातील मंजूर वीज उपकेंद्रे तातडीने सुरू करून अखंड वीजपुरवठा करावा, अशी मागणी रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Back to top button